जलसमाधीचा निर्णय स्थगित; आंदोलन सुरूच

By admin | Published: April 19, 2015 11:42 PM2015-04-19T23:42:05+5:302015-04-20T00:22:45+5:30

तिलारी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न : झटापटीनंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडविले

Adjournment of water resources; Stir agitation | जलसमाधीचा निर्णय स्थगित; आंदोलन सुरूच

जलसमाधीचा निर्णय स्थगित; आंदोलन सुरूच

Next

कसई दोडामार्ग : पालकमंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन धुडकावून लावत तिलारी धरणग्रस्तांनी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला होता; मात्र पोलिसांनी अडविल्यामुळे जलसमाधीचा निर्णय स्थगित केला. यावेळी पोलीस व आंदोलनकर्त्यांत काहीकाळ झटापटही झाली. यानंतर आंदोलन सुरूच ठेवून शासन निर्णयाची वाट पाहणार व त्यानंतर पुन्हा जलसमाधीचा निर्णय घेऊ, असा इशारा रविवारी आंदोलनकर्त्यांनी दिला.
तिलारी प्रकल्पग्रस्तांची वनटाईम सेटलमेंट रक्कम न मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांनी बुधवारपासून ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली होती. रविवारी आंदोलनाचा पाचवा दिवस होता. प्रकल्पग्रस्त आपल्या मागणीसाठी जलसमाधी घेणार, या निर्णयावर ठाम राहिल्याने पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. दुपारी ग्रामविकास, वित्तमंत्री व पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भेट देऊन चर्चा केली. गोवा राज्याने वनटाईम सेटलमेंटची तरतूद केली आहे. महाराष्ट्र शासनाकडे तुमचा प्रस्ताव ठेवला आहे. उद्या, मंगळवारी मुंबई येथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीमध्ये वनटाईम सेटलमेंटच्या रकमेबाबत अंतिम निर्णय घेऊन महिन्याच्या आत जीआर काढून रक्कम देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री केसरकर यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. दरम्यान, याआधीही केसरकर यांनी आश्वासने दिली होती. त्यामुळे आंदोलनाचे नेते संजय नाईक यांनी आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा घेतला.
तत्पूर्वी आंदोलनकर्ते ‘आम्हाला न्याय द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा देत जलसमाधी घेण्यासाठी जाऊ लागले, तेव्हा पोलिसांनी त्यांना साखळी करून अडवून ठेवले. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन झटापटही झाली. पोलीस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी यांनी प्रकल्पग्रस्तांना सुनावले की, तुम्ही कायदा हातात घेतला, तर आम्हालाही कायदा हातात घेऊन अटक करावी लागेल, असे सुनावले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू ठेवून जलसमाधीचा निर्णय स्थगित केला, परंतु उद्यापर्यंत निर्णय न झाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा संजय नाईक यांनी दिला. (वार्ताहर)

Web Title: Adjournment of water resources; Stir agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.