कंत्राटी पद्धतीने शिक्षण सेवक म्हणून होणार समायोजन, डी.एड. बेरोजगारांचे आंदोलन दहाव्या दिवशी स्थगित
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 25, 2024 06:30 PM2024-07-25T18:30:57+5:302024-07-25T18:32:24+5:30
संपूर्ण महाराष्ट्राला होणार फायदा
मनोज वारंग
ओरोस : स्थानिक डी एड बेरोजगारांना जिल्ह्यात कायमस्वरूपी कंत्राटी पद्धतीने शिक्षण सेवक म्हणून सामावून घेतले जाईल. तसेच स्थानिक डी.एड. पदवीधारक बेरोजगारांना अडसर ठरणारे निकष बदलून स्थानिकांना संधी मिळावी या दृष्टीने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बैठकीत निर्णय घेतले आहेत. या नव्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत गेले दहा दिवस भरपावसात सुरू ठेवलेले आंदोलन डी.एड. बेरोजगारांनी गुरुवारी तूर्तास स्थगित केले आहे.
शिक्षणसेवक म्हणून सामाऊन घ्यावे या मागणीसाठी डी. एड. बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने गेली दोन वर्षे लढा दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून गेले दहा दिवस स्थानिक वेळ बेरोजगार आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले होते. याची दखल घेत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी डी.एड. बेरोजगार समितीच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी निमंत्रित केले होते. या चर्चेसाठी सर्व संबंधित अधिकारी मंत्री आमदार उपस्थित होते.
शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत डी.एड. बेरोजगारांच्या समस्या जाणून घेत डी.एड. बेरोजगाराला अडचणीचे ठरणारे निकष बदलण्याचा निर्णय घेतला. तर स्थानिक डी.एड. बेरोजगाराला संधी मिळावी या दृष्टीने काही सकारात्मक निर्णय या बैठकीत घेण्यात आले. यामध्ये शालेय शिक्षणमंत्री यांनी पोलिस भरती प्रमाणे शिक्षक भरतीदेखील जिल्हानिहाय करण्याचे आदेश आयुक्तांना दिले.
१५ हजार मानधन मिळणार
कमी पटसंख्येच्या शाळातील रिक्त जागांवर पूर्ण कायमस्वरूपी शिक्षकासोबत कंत्राटी तत्त्वावर शिक्षणसेवक देण्यात येणार आहे. या कंत्राटी शिक्षकाला काढता येणार नाही, असा ठराव बैठकीत घेण्यात आला. कंत्राटी स्वरूपात घेण्यात आलेल्या शिक्षणसेवकास १५ हजार रुपये मानधन ठरविण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला होणार फायदा
शालेय शिक्षण मंत्री यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगरी निकष पाहता विशेष बाब म्हणून निर्णय घेतला असला तरी या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील डी.एड. बेरोजगार यांची उपासमार पाहता हा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू केला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक डी. एड. बेरोजगार संघटनेच्या वतीने सातत्याने केलेल्या मागणीचा फायदा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावरील स्थानिक डी.एड. पदविका धारक डी.एड. बेरोजगारांना होणार आहे. तसेच कंत्राटी शिक्षणसेवक नियुक्तीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला न देता मुख्य कार्यकारी अधिकारी/ शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात परीक्षा केंद्र निर्माण करण्याचे आश्वासन
स्थानिक डी.एड. पदविकाधारक उमेदवारांना नियुक्त्या ह्या लगतच्या गावात किंवा त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी देण्यात येतील, असे या बैठकीत ठरविण्यात आले. तसेच जिल्ह्यातील डी.एड. पदविकाधारक उमेदवारांना कायमस्वरूपी शिक्षक या पदासाठी आवश्यक असलेली टीईटी परीक्षा देणे सुलभ व्हावे यासाठी ऑनलाइन प्रशिक्षणाची सोय तसेच जिल्ह्यात परीक्षा केंद्र निर्माण केले जाईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सर्व मंत्र्यांच्या उपस्थितीत दिले असल्याची माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय फाले यांनी सांगितले.