‘सरस’च्या तारखेपूर्वी प्रशासनाची फुगडी
By admin | Published: February 8, 2016 11:04 PM2016-02-08T23:04:33+5:302016-02-08T23:24:26+5:30
तारीख पुढे ढकलली : काँग्रेसचा सुंदरवाडी महोत्सव मात्र पोलीस परेड मैदानावरच
सावंतवाडी : कोकण सरस महोत्सवाची तारीख ठरण्यापूर्वी प्रशासनाने घातलेल्या फुगडीमुळे सुंदरवाडी महोत्सवाच्या आयोजकांना आपली जागा बदलावी लागली. कोकण सरस नियोजित कार्यक्रम रद्द झाल्याने प्रशासन चांगलेच नाकावर आपटले आहे. शासनाचा कार्यक्रम रद्द झाला, तरीही काँग्रेसने सुंदरवाडी महोत्सव पोलीस परेड मैदानावरच घेण्याचे निश्चित केले आहे.
गेल्यावर्षीपासून काँग्रेसच्यावतीने सावंतवाडीत सुंदरवाडी महोत्सवाचे आयोजन केले जाते. महोत्सव येथील जिमखाना मैदानावर होत असतो. मात्र, या महोत्सवावेळी सत्ताधारी व काँग्रेस यांच्यात मैदानावरून राजकारण पेटले होते. काँग्रेसने आपल्या कार्यक्रमांची तारीख जाहीर करताच त्याच कालावधीत शासनाच्या ग्रामीण विकास यंत्रणेचा ‘कोकण सरस महोत्सव’ आयोजित केला होता. त्यांच्या तारखाही जाहीर केल्या होत्या.
प्रारंभी कोकण सरस महोत्सवाची तारीखही ६ ते १३ फेबु्रवारी होती. मात्र, त्यात बदल करून शासनाने १२ ते १८ फेबु्रवारी अशी केली. याच कालावधीत म्हणजेच १९ ते २१ फेबु्रवारी अशी सुंदरवाडी महोत्सवाची तारीख ठरविली होती. या सर्व गोंधळात काँग्रेसने १७ फेबु्रवारीपासून जिमखाना मैदानाची मागणी केली होती, पण ती मागणी प्रशासनाने फेटाळली होती. काँग्रेसने पालिकेकडे १३ जानेवारीला मैदानाची मागणी केली होती. शासनाने १७ जानेवारीला मैदान मागितले होते. मैदान नाकारल्यानंतर त्या विरोधात काँग्रेसने नगरपालिकेसमोर उपोषणही केले होते. मात्र, त्यातून मार्ग निघाला नसल्याने अखेर काँग्रेसलाही एक पाऊल मागे येत पोलीस परेड मैदानाचा पर्याय स्वीकारावा लागला होता.
आठवडाभर प्रशासन विरुद्ध काँग्रेस असा वाद रंगला होता. हा वाद संपतो न संपतो तोच कोकण सरस महोत्सवाची तारीख बदलल्याचे शासनाच्या वतीने जाहीर केले आहे, पण ज्या कारणासाठी हा कोकण सरस महोत्सवाची तारीख पुढे ढकलली. तो कार्यक्रम एक महिन्यापूर्वी जाहीर झाला होता. मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रम आयोजित केला असून, यात मंत्री, अधिकारी सहभागी होणार आहेत. १३ फेबु्रवारीला कोकण सरस महोत्सवाचे उद्घाटन होते. त्या दिवशी पंतप्रधानांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आहे. असे असताना प्रशासनाने एवढी आडमुठी भूमिका का स्वीकारावी, याचेच कोडे आहे.
प्रशासनाची फुगडी मंत्र्यांच्या तालावर होती की मंत्र्यांची फुगडी प्रशासनाच्या तालावर होती, याचेच कोडे उलगडणे कठीण आहे. ग्रामीण विकास यंत्रणा हा विभाग मंत्री पंकजा मुंडे व राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या नियंत्रणाखाली येत असतो. या खात्याचे मंत्री केसरकर हे जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत. त्यामुळे त्यांनी हा वाद वाढविण्यापेक्षा क्षणात संपवला असता. मात्र, ते या सर्व वादापासून नामानिराळे राहिल्याने आश्चर्य वाटत आहे.
प्रशासनाविरोधात उपोषण केल्यानंतर काँग्रेसला पोलीस परडे मैदान मिळाले. मात्र, आता कोकण सरस कार्यक्रम रद्द झाल्यानंतरही काँग्रेसने पवित्रा कायम ठेवला असून, कार्यक्रम पोलीस परेड मैदानावरच होईल, असे सांगितले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या फुगडीत सुंदरवाडी महोत्सवाचे मैदान बदलले. प्रशासनाने कार्यक्रमाची निश्चिती झाल्यानंतर काँग्रेसशी लढाई केली असती, तर आता प्रशासनाला तलवार म्यान करून बसण्याची वेळ आली नसती.
पंतप्रधानांच्या कार्यक्रमामुळे तारीख पुढे ढकलली
कोकण सरस महोत्सव १३ फेबु्रवारीला सुरू होणार होता. मात्र, पंतप्रधानांचा मुंबईत त्याच दिवशी कार्यक्रम असल्याने कोकण सरस महोत्सवाची तारीख बदलली असून, शासनाने नवीन तारीख जाहीर केली नाही. याबाबतचे पत्र सोमवारी आपणास प्राप्त झाल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.
आता महोत्सवांची जागा बदलणे अशक्य : परब
आम्ही गेल्या वर्षी सुंदरवाडी महोत्सव जिमखान्यावर घेतला होता. यावर्षीही तेथेच घेणार होतो. त्याचे पैसेही एक महिना अगोदर भरले होते, पण आम्हाला पालिका प्रशासनाने मैदान नाकारले. त्यामुळे आता आम्ही तहसीलदार सतीश कदम यांच्या विनंतीला मान देऊन पोलीस परेड मैदानावर महोत्सव घेण्याचे निश्चित केले आहे. कोकण सरस कार्यकम पुढे ढकलला, याची आम्हाला माहिती नाही, पण आता आमच्या महोत्सवाची जागा बदलणे अशक्य आहे, असे मत काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केले.