डॉक्टरांच्या संपामुळे प्रशासनाची गोची
By admin | Published: July 3, 2014 11:54 PM2014-07-03T23:54:08+5:302014-07-03T23:59:08+5:30
रूग्णांचे हाल : ग्रामीण भागातील आरोग्य सेवा ढेपाळली
सिंधुदुर्गनगरी : विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील शासकीय डॉक्टर मंगळवारपासून संपावर गेले आहेत. संपकरी डॉक्टर मागण्यांवर ठाम असून त्यांचा परिणाम रूग्णसेवेवर झाला आहे. डॉक्टरांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासन गांभिर्याने पाहत नसल्याने नाराजीचा सूर आहे. गुरूवारी आंदोलनाचा तिसरा दिवस होता. मागण्यांवर डॉक्टर ठाम असल्याने जिल्हा प्रशासनाची पुरती गोची झाली आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा पूर्णपणे ढेपाळली असून रूग्णांचे हाल होण्यास सुरूवात झाली आहे.
आठ तास ड्युटी हवी, अस्थायी कालावधीत वेतन व भत्ते देण्यात यावेत, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या वेतनवाढी बहाल कराव्यात, अस्थायी डॉक्टरांनी कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणे आदी मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२७ वैद्यकीय अधिकारी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. वैद्यकीय अधिकारी संपावर गेल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा पूर्णपणे ढेपाळली असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. त्यामुळे रूग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. गुरूवारी आंदोलनाचा तिसरा दिवस असून आजही आंदोलन मागे घेण्यासंदर्भात व शासनाकडून मागण्या मान्य करण्याबाबत कोणतीही सूचना न आल्याने आजही कामबंद आंदोलन सुरू आहे.
संपकरी डॉक्टर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले तर काही दिवसात जिल्ह्यातील गोरगरीब रूग्ण मेटाकुटीस येणार आहेत. साथरोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. (प्रतिनिधी)