प्रशासनात सकारात्मक ऊर्जा गरजेची
By admin | Published: July 1, 2015 09:44 PM2015-07-01T21:44:23+5:302015-07-02T00:29:54+5:30
ई. रवींद्रन : सिंधुदुर्गनगरीत जिल्हाधिकाऱ्यांचा निरोप समारंभ
सिंधुदुर्गनगरी : प्रशासनात काम करताना सकारात्मक ऊर्जा अंगी असावी लागते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद अथवा जिल्हाधिकारी या कार्यक्षेत्रात काम करताना सर्वांच्या सहकार्यामुळेच चांगले काम करू शकलो, असे मत माजी जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी व्यक्त केले.जिल्हा नियोजन समिती सभागृहात माजी जिल्हाधिकारी यांचा निरोप समारंभ व नूतन अधिकारी यांच्या स्वागत समारंभ कार्यक्रमात माजी जिल्हाधिकारी ई. रवींद्रन बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, अतिरिक्त, जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, सावंतवाडी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, कुडाळ प्रांताधिकारी रवींद्र बोंबले, कणकवली प्रांताधिकारी संतोष भिसे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांच्यासह अधिकारी व कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. ई. रवींद्रन म्हणाले, प्रशासनात काम करण्यारसाठी काहीवेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात. कोणतीही व्यक्तिगत भावना त्यापाठीमागे नसते. सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेण्यात येतो. जिल्हाधिकारी म्हणून काम करताना आलेले अनुभव निश्चित पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरतील. सर्व एकत्र आल्यामुळे चांगले काम करता आले. यापुढेही नूतन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही आपली अशीच साथ लाभेल अशी आशा व्यक्त करतो.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी शेखर पाडगावकर, जिल्हा परिषद सदस्या जान्हवी सावंत, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविकात ज्ञानेश्वर खुटवड म्हणाले की, इंग्रजी पर्यटन वेबसाईट, कॉफी टेबल बुक, पर्यटन महोत्सव, लोकसभा व विधानसभा निवडणुका, महसूल विभागात केलेले बदल, तलाठी भरती प्रक्रिया, विविध बढती प्रक्रिया माजी जिल्हाधिकारी यांच्या कालावधीत मार्गी लागल्या. त्यांची निर्णय घेण्याची पद्धत अत्यंत
चांगली होती, असे मत व्यक्त केले. (प्रतिनिधी)
सूचनांचा अभ्यास करू : भंडारी
जिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले, गेले पाच दिवस माजी जिल्हाधिकारी यांच्यासोबत आहे. त्यांनी आम्हाला जिल्ह्याविषयी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रश्न व त्या अनुषंगाने माजी जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी केलेल्या सूचना नक्कीच लक्षात ठेवून त्याप्रमाणे काम करू.
रवींद्रन यांच्याप्रमाणे काम करू : शेखर सिंह
मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह म्हणाले, माजी जिल्हाधिकारी यांनी एवढ्या मोठ्या पदावर असतानाही त्यांची सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत नक्कीच प्रेरणा देणारी आहे. मी त्यांच्या कामामुळे प्रभावित झालो आहे.