तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज : उदय सामंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 05:24 PM2021-07-15T17:24:56+5:302021-07-15T17:27:45+5:30
CoronaVirus Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोवीडचा प्रादुर्भाव कमी होत आहे. आता तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात अत्यावश्यक असलेल्या एका प्राथमिक आरोग्य केंद्रासह अकरा आरोग्य उपकेंद्रांना शासनाने नव्याने मंजुरी दिली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोवीडचा प्रादुर्भाव कमी होत आहे. आता तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात अत्यावश्यक असलेल्या एका प्राथमिक आरोग्य केंद्रासह अकरा आरोग्य उपकेंद्रांना शासनाने नव्याने मंजुरी दिली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी कोविड बाबत उपाय योजना, पर्जन्यवृष्टी आणि नवीन उपक्रमाबाबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते .यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते उपस्थित होते.
पालकमंत्री सामंत म्हणाले, जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा खेड्यापाड्यात निर्माण व्हावी. ग्रामीण भागातील जनतेची सोय व्हावी. यासाठी आमदार वैभव नाईक यांचे प्रयत्न सुरू होते. त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून राज्य शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक प्राथमिक आरोग्य केंद्र व ११ आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी दिली आहे.
यामध्ये कुडाळ तालुक्यात सोनवडे प्राथमिक आरोग्य केंद्र, व माड्याचीवाडी, गोवेरी, आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी दिली आहे तर सावंतवाडी तालुक्यात भोम-कोलगांव , सोनुर्ली, दोडामार्ग तालुक्यात मोरगाव, वझरे, घोडगेवाडी, वेंगुर्ला तालुक्यात रेडी नंबर-२ ,पेंडूर, कांबळेवीर आणि कणकवली तालुक्यातील असलदे, या आरोग्य उपकेंद्र यांना मंजुरी दिली आहे.
गणेशोत्सवासाठी आवश्यक ती नियमावली
गणेशोत्सव कालावधीत कोरोनाची साथ पुन्हा वाढू नये याबाबत खबरदारी घेत असताना गणेशोत्सवासाठी मुंबईहून येणारे चाकरमानी आणि स्थानिक लोक याना कोणताही त्रास होणार नाही, गणेशोत्सव आनंदात साजरा व्हावा. यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवश्यक ती खबरदारी घेत नियमावली तयार करण्यात येणार आहे. आणि त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येईल. असे यावेळी पालकमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.