महोत्सव तयारीत प्रशासन गुंतले, शहर खुलले

By admin | Published: April 27, 2015 10:21 PM2015-04-27T22:21:03+5:302015-04-28T00:26:51+5:30

प्रतीक्षा चारच दिवसांची : जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन महोत्सवाच्या समित्यांची लगबग

The administration started engaging in the festival, the city opened | महोत्सव तयारीत प्रशासन गुंतले, शहर खुलले

महोत्सव तयारीत प्रशासन गुंतले, शहर खुलले

Next

रत्नागिरी : पर्यटन महोत्सव आता चारच दिवसांवर आल्याने त्याच्या अनुषंगाने सर्व तयारीला आता वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांसह इतर प्रमुख मंत्रीगणांना तसेच विविध मान्यवरांना महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या वाळूशिल्प, नौकानयन, रॅपलिंग आदी स्पर्धांची तयारीही जोरदार सुरू आहे.
रत्नागिरीत २ ते ४ मे या कालावधीत पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याच्या तयारीसाठी जिल्हा प्रशासनाची लगबग सुरू आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनाखाली निवडलेल्या समित्या पर्यटन यशस्वी करण्यासाठी झटत आहेत. यासाठी लोगो, स्लोगन स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा पहिल्या टप्प्यात घेण्यात आल्या. त्यांचे विजेतेही जाहीर करण्यात आले आहेत.
या पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात आले आहे. रत्नागिरीचे सुपुत्र केंद्रीय अवजड, उद्योगमंत्री अनंत गीते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, पालकमंत्री रवींद्र वायकर, नियोजनमंत्री दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, रत्नागिरी - सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, राज्यसभेचे सदस्य हुसेन दलवाई, विधानपरिषद सदस्य, विधानसभा सदस्य, पर्यटन सचिव वल्सा नायर सिंह, रत्नागिरीच्या पालक सचिव राधिका रस्तोगी, कोकण आयुक्त राधेश्याम मोपलवार आदींनाही जिल्हा प्रशासनाकडून आमंत्रित करण्यात आले आहे.
२ ते ४ मे या कालावधीत भाट्ये बीच येथे साहसी कला, शिल्पकला, नौकानयन आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्वांतत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात संगीत तसेच मुलांसाठी पपेट शो, मॅजिक, जगलरी आदी कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रमांसह लोककला, मनोरंजनाचे कार्यक्रम गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या पटांगणावर होणार आहेत. या तीन दिवसांच्या कालावधीत शाल्मली खोलगडे, सीमरन कौर, अंशुमन विचारे, अरूण कदम, कमलाकर सातपुते, माधवी जुवेकर, अंकुश काकडे तसेच रत्नागिरीचे लिटिल चॅम्प्स प्रथमेश लघाटे आणि शमिका भिडे, बेला शेंडे, स्वप्नील बांदोडकर, धवल चांदवडकर, सावनी रवींद्र यांसारख्या लोकप्रिय कलाकारांची उपस्थिती लाभणार आहे.
सर्वांचीच उत्सुकता या पर्यटन महोत्सवाने वाढवली आहे. त्यामुळे आता अगदी चारच दिवसांवर येऊन ठेपलेल्या या महोत्सवाच्या तयारीत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासह, सर्व उपविभागीय अधिकारी तसेच वेगवेगळ्या जबाबदारींसाठी निवडलेल्या सर्व समित्या गुंतल्या आहेत. रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधले जावे, यादृष्टीने शहरातील प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या भिंतीवर २८ विविध स्थळे, कोकणातील निसर्गसंपदा यांची चित्र रेखाटण्याचे काम सावर्डे कला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश राजेशिर्के यांच्या मागदर्शनाखाली २० विद्यार्थ्यांचा चमू काम करीत आहे. महोत्सवाला आता काही दिवसच राहिल्याने हे काम पूर्ण करण्यासाठी अखंड मेहनत घ्यावी लागत असल्याचे प्रा. राजेशिर्के यांनी सांगितले.
या महोत्सवाचे आकर्षण म्हणजे मारूती मंदिर ते पर्यटन महोत्सवाच्या स्थळापर्यंत (गोगटे - जोगळेकर पटांगण) काढली जाणारी शोभायात्रा. यात विविध मान्यवरांसह नागरिकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. यात कोकणातील विविध वैशिष्ट्ये, निसर्गसंपदा यांचे चित्ररथाद्वारे प्रदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे ही शोभायात्रा सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. महोत्सवाची तयारी अंतिम टप्पात आली आहे. (प्रतिनिधी)


पर्यटन महोत्सवाची तारीख निश्चित झाल्या दिवसापासून जिल्हा प्रशासन त्याच्या तयारीत अडकले आहे. या पर्यटनाची माहिती इतर जिल्ह्यांना व्हावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. इतर जिल्ह्यांमध्येही पत्रकार परिषद घेऊन त्याची माहिती देत आहेत. या पर्यटन महोत्सवात फळांचा राजा हापूस याच्याबरोबरच इतर सर्व फळांची, विविध स्थळांची माहिती पर्यटकांना करून दिली जाणार आहे. महोत्सवानिमित्त बाहेरच्या नामवंत कलाकारांबरोबरच कोकणातील पारंपरिक कलाही सादर होणार आहेत.


पर्यटन महोत्सवाचा प्रचार आणि त्याची प्रसिद्धी व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच पर्यटन महोत्सवाचा लोगो आणि स्लोगन असलेली बस एस. टी. प्रशासनाच्या सहकार्याने शहरात तसेच इतर तालुक्यांमध्येही फिरत आहे. या आकर्षक रंगाने रंगवलेल्या बसमुळे महोत्सवाबद्दल सामान्यांच्या मनात जिज्ञासा वाढविण्यास मदत होत आहे. त्याचबरोबर पर्यटकांनाही आकर्षित करून घेण्यास मदत होत आहे.



सह्याद्री आर्ट कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मनोरूग्णालयाच्या भिंतीवर जिल्ह्यातील प्रमुख विविध स्थळे आणि निसर्गसंपदा यांची चित्र काढण्यात येत आहेत. हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांचे याकडे लक्ष वेधले जात आहे. चित्रातील ही स्थळे पर्यटकांनाही आकर्षित करून घेत आहेत. त्यामुळे ही चित्र पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने पर्यटनवाढीला पोषक ठरत आहेत.


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सह्याद्री आर्ट कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून कोकणातील जांभ्या दगडापासून विविध प्राण्यांची प्रतिकृती तयार केली जाणार आहे. सध्या समुद्री घोड्याची प्रतिकृती या विद्यार्थ्यांकडून साकारली जात आहे. याचबरोबर कासव, मासा आदींच्या प्रतिकृती करून त्या शहरात विविध भागात ठेवल्या जाणार आहेत.

Web Title: The administration started engaging in the festival, the city opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.