सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी प्रशासनाची पूर्वतयारी पूर्ण, पोलिस अधीक्षक अग्रवाल यांनी दिली माहिती
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 17, 2024 07:28 PM2024-06-17T19:28:00+5:302024-06-17T19:28:13+5:30
लांबून येणाऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था
मनोज वारंग
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ जून ते १ जुलै या कालावधीत पोलिस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी पोलिस प्रशासनाची पूर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी ४० अधिकारी आणि २०० कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
साैरभ अग्रवाल म्हणाले, पोलिस भरतीतील १६०० मीटर आणि ८०० मीटर धावणे हा प्रकार रस्त्यावर घेतला जाणार आहे. तर १०० मीटर धावणे ही मैदानी परीक्षा पोलिस परेड मैदानावर घेण्यात येणार आहे. यासाठी तज्ज्ञांचे मत घेऊन मैदान तयार करण्यात आले आहे.
पावसामुळे व्यत्यय येऊ नये म्हणून व्यवस्था
पावसामुळे व्यत्यय येऊ नये म्हणून व्यवस्था करण्यात आली आहे. या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु पावसामुळे उमेदवारांच्या मैदानी चाचणीवर दुष्परिणाम होणार नाही. त्यासाठी सिंधुदुर्ग पोलिस दल सज्ज आहे.
खास वैद्यकीय पथक नियुक्त
उमेदवाराला कोणतीही दुखापत होणार नाही. कोणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेणार आहोत, खास वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आले आहे. दररोज सकाळी ६:३० वाजता ही परीक्षा सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी ५०० उमेदवार बोलाविण्यात आले आहेत. इतर दिवशी साडेसातशे उमेदवार बोलाविण्यात आले आहेत. याची माहिती उमेदवारांना ई मेल, मॅसेज आणि कॉल करून देण्यात आली आहे.
एकुण १८ हजार ४२ अर्ज दाखल
जिल्ह्यात ११३ शिपाई पदासाठी ५ हजार ९२०, पाच बँड पथक पदासाठी ६८३ आणि २४ चालक पदासाठी एक हजार ३३९ अशाप्रकारे एकूण १८ हजार ४२ अर्ज दाखल झाल्याचे यावेळी अग्रवाल यांनी सांगितले.
..तर पुरावा सादर करा
ही परीक्षा पारदर्शी घेतली जाणार आहे. एखाद्या दिवशी दिवसभर पाऊस पडल्यास त्या उमेदवारांना १ जुलै नंतरची वेळ दिली जाणार आहे. तसेच एकाचवेळी राज्यभर भरती प्रक्रिया होत असल्याने कोणत्याही एका पदासाठी एकाच ठिकाणी अर्ज करण्यास मुभा होती. परंतु एखाद्या उमेदवाराने अन्य पदासाठी अर्ज दाखल केला असल्यास आणि आम्ही बोलाविलेल्या दिवशीच तिकडे मैदानी परीक्षा असल्याने तो गैरहजर राहिल्याचा पुरावा सादर केल्यास त्याला नंतरची वेळ देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
लांबून येणाऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था
राज्यातील सर्व मैदानी परीक्षा पूर्ण झाल्यावर एकावेळी लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तसेच सिंधुदुर्गात उमेदवार कमी असल्याने धावण्याच्या परीक्षेसाठी चीप वापरली जाणार नाही. स्टॉप वॉच वापरले जाणार आहे. डॉक्युमेंट पडताळणी होमगार्ड कार्यालय येथे होणार आहे. लांबून येणाऱ्या उमेदवारांच्या राहण्यासाठी होमगार्ड कार्यालय, अन्य शासकीय कार्यालये तसेच मंगल कार्यालये येथे व्यवस्था करण्यात आली आहे.
संपूर्ण स्पर्धेची व्हिडीओग्राफी होणार
उंची, छाती, १०० मीटर धावणे, १६०० मीटर धावणे आणि गोळा फेक अशी पुरुषांची तर उंची, १०० मीटर धावणे आणि, ८०० मीटर धावणे आणि गोळा फेक अशी महिला उमेदवारांची परीक्षा घेतली जाणार आहे. या पूर्ण स्पर्धेची व्हिडीओ ग्राफी केली जाणार आहे, असे यावेळी पोलिस अधीक्षक अग्रवाल यांनी सांगितले.