सातार्डा येथे ट्रक अडविला --पत्रकाराचा कॅमेरा फोडला
By admin | Published: December 15, 2014 10:08 PM2014-12-15T22:08:17+5:302014-12-16T00:04:42+5:30
गौडबंगाल : ट्रक तपासणीवरून ग्रामस्थ आक्रमक
सार्ताडा : सेव्हन स्टार मायनिंग कंपनीच्या नावाने संशयास्पदरित्या सातार्डा येथे आलेल्या कॅल्शीयम हायड्रोक्साईड पदार्थामागचे गौडबंगाल रात्री उशिरापर्यंत उलगडले नव्हते. सातार्डा ग्रामस्थांनी ट्रकची तपासणी करण्याची मागणी करून सुध्दा पोलिसांनी ग्रामस्थांच्या डोळ्यात धुळफेक करत हा ट्रक मायनिंग कंपनीला घेऊन जाण्यास मुभा दिल्याने ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. संबंधित ट्रकमधील मालाबरोबरच पोलिसांची ही चौकशी करण्याची मागणी होत आहे.
सातार्डा येथे सेव्हन स्टार नावाची कोणतीही कंपनी नसतानाही सोमवारी पहाटे संशयास्पदरित्या एक ट्रक सातार्डा येथे एक चलन घेऊन व्यक्ति फिरत होती. या चलनावर कॅल्शिअम हायड्रोक्साईड असे लिहिले होते. यामुळे ग्रामस्थ घाबरले आणि नेमकी सेव्हन स्टार ही मायनिग कंपनी नसताना त्या कंपनीच्या नावाने कोणता माल आला, असा प्रश्न उपस्थित करत हा पदार्थ ज्वलनशील असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
यात स्फोटकाचे सामान कशावरून नसेल म्हणून या ट्रकची कसून चौकशी करा, या मागणीसाठी सातार्डा सरपंच रंजना नाईक, सहदेव कोरगावकर, शंकर साटेलकर, पोलीस पाटील साटेलकर तसेच देवी माऊली हितवर्धक संघाने हा ट्रक पोलिसांना बोलावून त्यांच्या स्वाधीन केला.
पोलिसांनी ही घटनेचे गांभीर्य ओळखून हा ट्रक पोलीस दूरक्षेत्रावर नेऊन ठेवला. त्याचवेळी तेथे ग्रामस्थांनी गर्दी केली होती. यानंतर तेथे सावंतवाडी पोलीस निरीक्षक रणजित देसाई हे दाखल झाले. त्यावेळी ग्रामस्थांनी सेव्हन स्टार मायनिंग कंपनीबाबत खुलासा करा, अशी मागणी केली. यावेळी पोलिसांनी समृध्दा मायनिंगचे ठेकेदार दत्ता कवठणकर यांच्यासह कंपनीच्या अधिकाऱ्यांना तेथे बोलावले. यावेळी कवठणकर तेथे दाखल झाल्यावर ग्रामस्थ आणखी आक्रमक झाले आणि त्यांनी ट्रक तपासा, अशी जोरदार मागणी केली.
या मागणीवर ग्रामस्थ अडून बसल्याने दत्ता कवठणकर व ग्रामस्थ यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी तेथील पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. पण ट्रक तपासला नाही. आणि तो ट्रक गोव्याच्या दिशेने जाण्यास दिला. काही ग्रामस्थांनी ट्रक मध्ये चढून मालाची तपासणी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यात मैद्याची पोती आढळून आली. मग चलनावर कॅल्शियम हायड्रोक्साईड लिहिलेले कसे, असा सवाल करीत ग्रामस्थांनी पोलिसांना धारेवर धरले तसेच ट्रक पाठवून दिल्याबद्दल पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांच्यासह सातार्डा येथील पोलिस कर्मचारी आर. डी. माने यांच्यावर आरोप करीत कारवाईची मागणी केली आहे. घटनेनंतर देवी माऊली हितवर्धक ट्रक चालक मालक संघाने कवठणकर यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप करीत तक्रार दिली आहे.
पोलीस म्हणतात ‘ती’ पावडर
सातार्डा येथे पकडण्यात आलेला ट्रक संशयास्पद नसून आतमध्ये ज्वलनशील पदार्थ नाही, असा दावा सावंतवाडी पोलीस निरीक्षक रणजीत देसाई यांनी केला असून ट्रकमध्ये पावडर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (वार्ताहर)
पत्रकाराचा कॅमेरा फोडला
सातार्डा येथे ट्रक अडवण्याचा प्रकार सुरू असतानाच तेथे पत्रकार आपले कर्तव्य म्हणून फोटो घेण्याचे काम करत होता. यावेळी ठेकेदार दत्ता कवठणकर यांनी त्या पत्रकाराचा कॅमेरा फेकून देत मोडतोड केली. या प्रकारामुळे ग्रामस्थांनी आणखी संताप व्यक्त केला.