दारूबंदीसाठी तंटामुक्त समितीचा पुढाकार हवा

By admin | Published: October 2, 2014 10:17 PM2014-10-02T22:17:56+5:302014-10-02T22:25:37+5:30

संसार उद्ध्वस्त : ग्रामीण भागात अजूनही हातभट्ट्यांची धगधग

Advocacy of conflict-free committees for drinking | दारूबंदीसाठी तंटामुक्त समितीचा पुढाकार हवा

दारूबंदीसाठी तंटामुक्त समितीचा पुढाकार हवा

Next

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी-दारूच्या व्यसनामुळे कित्येक संसार उद्ध्वस्त होत असल्याचे निदर्शनास येत आहे. ग्रामीण भागात हातभट्ट्या धगधगत आहेत. हातभट्ट्यांची संख्या अल्प असली तरी गावोगावी विक्रेत्यांची संख्या अधिक आहे. गावोगावी नियुक्त करण्यात आलेल्या तंटामुक्त समित्यांनी याकामी पुढाकार घेतला तर संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी होऊ शकते.
रत्नागिरी जिल्ह्यात २००७ पासून तंटामुक्त गाव अभियानाला प्रारंभ झाला. दिवाणी, महसूल, फौजदारी व इतर प्रकारचे तंटे सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. तंटे सोडवून गावात शांतता प्रस्थापित करण्याबरोबरच ग्राम सुरक्षा, दारूबंदी यांसारखे उपक्रम राबवण्याची गरज आहे. जेणेकरून गावात खऱ्या अर्थाने शांतता निर्माण होईल, संसार सुखाने नांदतील. तंटामुक्त समित्या व ग्रामस्थांचा सुरूवातीला उत्साह अधिक होता. पहिल्या तीन वर्षांत समित्यांच्या बैठका नियमित होऊन तंटे सोडवण्यावर विशेष भर देण्यात येत होता. एकूणच तंटामुक्त गावासाठी असलेल्या लाखो रूपयांच्या पारितोषिकांमुळे ग्रामस्थ, समित्यांमध्ये उत्साह दांडगा होता.
तडजोडीने मिटणारे सर्व तंटे गावातच मिटावे, असे योजनेचे उद्दिष्ट असल्याने समित्या त्यासाठी प्रयत्नशील होत्या. जिल्ह्यातील ८५१ ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत ५४१ ग्रामपंचायती तंटामुक्त घोषित झाल्या आहेत. अद्याप ३१० गावे तंटामुक्त झालेली नाहीत. दरवर्षी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या अधिक आहे. परंतु तंटामुक्त समित्यांनी तंटे मिटविण्याबरोबर गावात शंभर टक्के दारूबंदी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
दारुच्या व्यसनाने अंकुश वेलोंदे याने आपलं कुटुंब उद्ध्वस्त केले. दारूच्या नशेत पत्नीचा खून केला. त्यानंतर आत्महत्या केल्याने आता तिन्ही मुलांचे जीवन अंधारमय झालं आहे. आजीही वृध्द झाल्याने तिचा आधार कुठपर्यंत मिळणार आहे. व्यसनाधीन झालेल्या अंकुशला अनेकांनी समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो निष्फळ ठरला होता. अखेर त्याने व्यसनाच्या भरात स्वत:सह पत्नीचाही घात करुन मुलांना वाऱ्यावर सोडले.
या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने ओरी गाव हादरला. त्याचबरोबर रूग्णालयात उपचारासाठी दाखल पतीनेच डबा घेऊन आलेल्या पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटना निकटच्या असल्या तरी अशा प्रकारच्या अनेक घटना वर्षभरात घडत असतात. त्यामुळे त्यासाठी तंटामुक्त समित्यानी सामाजिक संस्थांच्या सहाय्याने व्यसनमुक्तीसाठी दारूबंदी करण्याची गरज आहे.
मिरजोळे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विठोबा पाटील सलग चार वर्षे तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद भूषवित आहेत. गावात त्यांनी दोन वर्षांपूर्वी (२०१२-१३) मध्ये संपूर्ण दारूबंदी केली होती. गावात घरोघरी फिरून दारूबंदीचे आवाहन करण्यात आले होते. तसा प्रयत्न सर्वत्र करणे गरजेचे असल्याचे मत विठोबा पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Advocacy of conflict-free committees for drinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.