प्रसूतीनंतर विवाहितेचा मृत्यू, नवजात बालिका सुखरूप
By admin | Published: August 17, 2016 11:36 PM2016-08-17T23:36:35+5:302016-08-17T23:58:30+5:30
शिरगाव येथील घटना : मृत्यूचे कारण अस्पष्ट
सावंतवाडी : देवगड तालुक्यातील शिरगाव येथील विवाहिता सुषमा संतोष पवार (वय ३५) हिला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले; पण अचानक तिचा रक्तदाब वाढल्याने तिला सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान बुधवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. नवजात बालिका मात्र सुखरूप आहे.
शिरगाव-निमतवाडी येथील विवाहिता सुषमा ही मुंबई सांताक्रुझ येथे पती संतोष सोबत राहत होती. बाळतंपणासाठी ती तळेबाजार येथे आपल्या माहेरी आली होती. तिला मंगळवारी दुपारी प्रसूतीच्या वेदना मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने तिच्या वडिलांनी तातडीने कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने तसेच विवाहितेला प्रसूती वेदनेवेळी रक्तदाब सतत वाढत गेल्याने कणकवलीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेतला.
त्याप्रमाणे विवाहितेला घेऊन आई-वडिलांसह तिच्या पतीने सावंतवाडी गाठत कुटीर रुग्णालयात दाखल केले. मंगळवारी रात्री उशिरा कुटीर रुग्णालयात शस्त्रक्रिया करीत तिची प्रसूतीही करण्यात आली. तिने बालिकेला जन्म दिला. मात्र, तोपर्यंत ती बेशुद्ध अवस्थेत होती. शस्त्रक्रियेनंतर काही वेळाने शुद्धीत आल्यानंतर तिने आपल्या मुलीला जवळ घेतले होते. मात्र, पहाटेच्या सुमारास अचानक त्या विवाहितेची प्रकृती खालावली. रक्तदाबही वाढला. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर तसेच डॉ. ज्ञानेश्वर ऐवले, डॉ. अभिजित चितारी यांनी तिचा रक्तदाब स्थिर करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह मृत विवाहितेच्या नातेवाईकांनाही धक्का बसला आहे.
सुषमा हिचे माहेर देवगड तालुक्यातील तळेबाजार येथे असून, सासर शिरगाव-निमतवाडी येथे आहे. तिचा संतोष पवार यांच्याशी चार वर्षांपूर्वी विवाह झाला होता. ती पहिल्यांदाच गर्भवती राहिली होती. त्यातच प्रसूतीदरम्यान पत्नीचे निधन झाल्याने पती संतोष याला मोठा धक्का बसला आहे. तर सुषमाच्या आईला मुलीच्या मृत्यूची माहिती समजताच तिला धक्काच बसला असून, तिला येथील कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिच्या पश्चात पती, नवजात मुलगी, दीर, जाऊ असा परिवार आहे. शिरगांव निमतवाडी येथील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात तिच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)
बालिकेचा निरागस चेहरा मनाला वेदना देणारा
सुषमा हिच्या मृत्यूनंतर नवजात बालिकेचा निरागस चेहरा पाहून रुग्णालयातील परिचारिका तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मन हेलावून जात होते. या निरागस चेहऱ्याला आपली आई या जगात नाही याची माहितीही नसणार, तिचे कसे होणार, या चिंतेने अनेकांना वेदना होत होत्या.
नेमके कारण समजले नाही : ऐवले
रुग्णालयाच्या माहितीनंतर सुषमा पवार यांच्या मृत्यूची नोंद येथील पोलिस ठाण्यात करण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून बुधवारी दुपारी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. मृतदेहाचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण काय ते समजू शकेल, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर ऐवले यांनी दिली.
मुलीला कवटाळल्यानंतर लगेचच मृत्यू
तिने आई-वडील तसेच पतीसोबत काही वेळ गप्पाही मारल्या. तसेच आपल्या मुलीला जवळ घेत कवटाळले. त्यानंतर काही वेळातच सुषमा हिचा अचानक रक्तदाब वाढला आणि तिचा मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईक हा प्रसंग आठवून हुंदके देत रडत होते.
सुषमावर शस्त्रक्रियेनंतर तिने नवजात बालिके ला जन्म दिला होता. काही वेळानंतर सुषमा शुद्धीत आली होती.