निधनानंतर वृद्ध कलाकाराचे मानधन

By Admin | Published: July 15, 2016 09:28 PM2016-07-15T21:28:53+5:302016-07-15T22:37:21+5:30

शासनाचा भोंगळ कारभार : हयात असेपर्यंत एकदा तरी पेन्शन मिळू द्या रे : कलाकाराची होती विनवणी

After the demise, old artist's honor | निधनानंतर वृद्ध कलाकाराचे मानधन

निधनानंतर वृद्ध कलाकाराचे मानधन

googlenewsNext

निकेत पावसकर-- नांदगांव मी हयात असेपर्यंत मला एकदा तरी पेन्शन मिळू द्या रे... अशी अनेकवेळा वृद्ध कलाकाराकडून होणारी विनवणी... वयोमानानुसार थकलेले शरीर आणि पोटापाण्याचा निर्माण झालेला न सुटणारा, दिवसेंदिवस गंभीर होत जाणारा प्रश्न... त्यामुळे सातत्याने प्रशासनातील त्या अधिकाऱ्यांसमोर नेहमीच पत्करावी लागणारी शरणागती... आणि स्वत: कलाकार असल्याचे द्यावे लागणारे दाखले... अशी परिस्थिती आहे एकेकाळी आपल्यातील कलेने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या वृद्ध कलाकारांची... सन २००९ ला प्रशासनाकडे वृद्ध कलाकार मानधन मिळणेसाठी नांदगांव येथील किशोर मोरजकर यांनी प्रस्ताव पाठविला होता. मात्र दुर्दैवाने मोरजकर यांच्या निधनानंतर शासनाकडून त्यांना वृद्ध कलाकार मानधन मंजूर करण्यात आले.नांदगांव येथील किशोर मोरजकर यांच्याबाबतीत घडलेली घटना या प्रशासन आणि शासनाच्या कारभाराबाबत अचूक प्रश्न निर्माण करणारी आहे. वृद्ध साहित्यिक, कलाकार मानधन योजनेंतर्गत त्यांनी आपला प्रस्ताव संबंधित विभागाकडे २००९ साली पाठविला होता. अनेकदा प्रशासनातील अधिकाऱ्यांना भेटून विनवणीही करण्यात आली होती. मात्र कोणतीच दखल घेतली नाही.
नांदगांव येथील किशोर मोरजकर हे पेटीवादक होते. त्यांचे १६ जुलै २०१४ रोजी निधन झाले. त्यांची एकच इच्छा होती की, हयात असेपर्यंत मला एकदातरी कलाकार मानधन मिळावे. परंतु त्यांची ती इच्छा अपूर्णच राहिली. त्यांच्या निधनानंतर मोरजकर यांच्या मुलाने मृत्यू दाखलाही संबंधित विभागाकडे सादर केला. तरीदेखील अलिकडे प्रसिद्ध झालेल्या वृद्ध कलाकार मानधन यादीत किशोर मोरजकर यांच्याही नावाचा समावेश आहे.
महिन्याला १५०० रुपये मानधन मिळत असलेल्या या योजनेचा लाभ मोरजकर यांच्यासारख्या सच्च्या कलाकाराच्या नशिबी हयात असताना आला नाही. जिल्हास्तरीय समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मात्र अनुदान नसल्यामुळे यांच्यासारखे जिल्ह्यातील अनेक प्रस्ताव अडकून पडले होते. ग्रामीण भागातील अक्षरश: आपल्या कुटुंबाची होळी करून कलेला दिलेल्या या योगदानाचे असे फळ मिळत असेल तर कलाकारांचे आयुष्य कोणालाही नकोसे होईल.
या लाभार्थ्यांना प्रतिमहा रुपये १५०० प्रमाणे तसेच त्यांच्या वारसाला मानधन अदा केले जाणार असल्याचेही जाहिर करण्यात आले. एप्रिल २०१५ पासून संबंधितांना थकीत मानधन अदा करण्यासाठी समाजकल्याण विभागाकडे काही रक्कम वर्ग केल्याचेही समजले. परंतु ती रक्कम कलाकाराच्या निधनानंतर कोणाला मिळणार? वारस कोणते? हेही प्रश्न उपस्थित राहतात. समाजातील काही कला जिवंत राहण्यासाठी अनेकजण आपले आयुष्य खर्ची घालतात. मात्र अशा वृद्ध कलाकारांकडे करण्यात येणारा हा दुर्लक्ष खरेच चीड आणणारा आहे. याकडे गांभीर्याने कधी पाहिले जाईल?
अशा वृद्ध अथवा निधन झालेल्या कलाकारांच्या पश्चात त्यांचे कुटुंबीयही अनेकदा हालअपेष्टा सोसत आयुष्य काढत असतात. अशा अनेक कलेपायी अनेकजण आपले उभे आयुष्य त्यासाठी झिजवतात. त्यापैकीच नांदगांव येथील कै. किशोर मोरजकर होते. ते हयात असेपर्यंत त्यांना कलाकार मानधन मंजूर झाले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर संबंधित विभागाकडून कलाकार मानधन मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र ते कलाकार मोरजकर मानधन घेण्यासाठी हयात नव्हते. त्यांची ती इच्छा अपूर्णच राहिली.
कलाकार मानधन
मंजूर झाल्यानंतर त्यांच्या मुलाने संबंधित विभागाकडे चौकशी
केली असता फक्त पत्नी हीच वारस असून तिलाच हे मानधन वारस म्हणून देऊ शकतो असे सांगण्यात आले. शेवटी या कलाकाराच्या वाट्याला आणि त्यांच्या वारसांनाही अशी अवहेलना नशिबी आली. अशा कारभारामुळे भविष्यात असे कलाकार निर्माण कसे होतील? पर्यायी कला जिवंत कशी राहिल? असे प्रश्न उपस्थित होतात.


ज्या दिवशी वृद्ध कलाकाराला मानधन मंजूर झाले,
त्यापासून त्याच्या निधनापर्यंतचे मानधन त्यांच्या रक्ताच्या कोणत्याही वारसाला मिळाले पाहिजे. संबंधित कार्यालयाकडे
पैसे नसतील तर त्यावेळी सभा घेऊन अशी प्रकरणे मंजूर का केलीत? त्या वेळेला पैसे असते तर अशा अनेक वृद्ध कलाकारांना वेळेवर मानधन मिळाले असते. यासाठी शासनासह प्रशासनही त्याला जबाबदार आहे. अशा प्रकारची चाललेली अवहेलना शासन आणि प्रशासनाने थांबवावी.
-बी. के. तांबे, (हळवल) (सदस्य २००७-२०१३ वयोवृद्ध
कलाकार मानधन कमिटी, सिंधुदुर्ग)

सेवाभावी ट्रस्टची स्थापना
किशोर मोरजकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनी १६ जुलै रोजी त्यांच्या नावाने सेवाभावी ट्रस्टची स्थापना करण्यात येणार आहे. या किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव संचलित शुभांगी तंत्रशिक्षण संस्था अशी आणखी एक संस्था स्थापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रमांसह प्रत्यक्ष बेरोजगार महिला व युवकांना काम मिळणारी प्रशिक्षणे आयोजित केली जाणार असल्याची माहिती या ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी दिली.

Web Title: After the demise, old artist's honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.