...यानंतर जिल्ह्यात फिरू देणार नाही
By admin | Published: January 19, 2016 11:32 PM2016-01-19T23:32:44+5:302016-01-19T23:36:32+5:30
नीतेश राणेंचा पालकमंत्र्यांना इशारा : काँग्रेसच्या आंदोलनाला १४४ कलम का?, प्रशासन दबावाखाली असल्याचा आरोप
सावंतवाडी : आज आम्ही तुमच्या घरावर मोर्चा काढतो, मात्र भविष्यात जिल्ह्याचा विकास असाच ठप्प राहिला, तर जिल्ह्यात तुमची गाडी फिरू देणार नाही, असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी दिला. आम्ही आंदोलनाचा इशारा दिला की, प्रशासन नेहमीच १४४ कलम का लावते, प्रशासन कोणाच्या दबावाखाली वागते आहे, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
काँग्रेसने पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर मंगळवारी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी काँग्रेस नेते व कार्यकर्ते माजी खासदार कार्यालयाकडून आंदोलनासाठी जात असताना त्यांना येथील श्रीराम वाचन मंदिरनजीक पोलिसांनी अडवले. त्यानंतर आमदार राणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी माजी खासदार नीलेश राणे, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, काँग्रेसचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत, विकास सावंत, अशोक सावंत, प्रभारी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजित देसाई, गोट्या सावंत, सभापती अंकुश जाधव, माजी सभापती गुरूनाथ पेडणेकर, तालुकाध्यक्ष संजू परब, शहरअध्यक्ष सुधीर आडिवरेकर, डॉ. जयेंद्र परूळेकर, संदिप कुडतरकर, मंदार नार्वेकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, अस्मिता बांदेकर आदी यावेळी उपस्थित होते.
आमदार नीतेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आघाडीच्या काळात अनेक प्रकल्प आले. मात्र, युतीच्या काळात हे प्रकल्प ठप्प झाले आहेत.
पालकमंत्री वृत्तपत्रातून निधीची घोषणा करतात. मात्र, प्रत्यक्षात एक रूपयांची कामे सुरू झाली नाहीत. पालकमंत्री दहशतवादाचा बाऊ करून निवडून आले आणि आता जिल्ह्याला वाऱ्यावर सोडले आहे. पालकमंत्री नेहमी प्रेमाने जग जिंकता येईल असे सांगतात. मात्र, प्रत्यक्षात ते आम्हाला सोडा जिल्ह्याला जिंकू शकले नाहीत.
त्यांनी फक्त गोव्याला प्रेमाने जिंकले, अशी खिल्ली केसरकर यांचे नाव न घेता उडवली. यापुढे केसरकरांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल केला नाही. तसेच जिल्ह्यातील विकासाची कामे सुरू झाली नाहीत, तर पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा यावेळी आमदार राणे यांनी दिला.
माजी खासदार नीलेश राणे यांनी तर शिवसेनेसह भाजपवर सडकून टीका केली. आम्ही आंदोलने का करतो, याचा जरा विचार पालकमंत्र्यांनी केला पाहिजे होता. खासदार विनायक राऊत दिल्लीत, तर दीपक केसरकर हे राज्यात जिल्ह्याचे नाव खराब होईल, असे काम करीत आहेत.
नारायण राणे हे पालकमंत्री असतानाची जिल्ह्याची कामगिरी आणि आताच्या पालकमंत्र्याच्या काळात जिल्ह्याची झालेली अधोगती सर्र्वानी ओळखावी, असे आवाहनही त्यांनी केले. आमदार वैभव नाईक यांनी आम्हाला आंदोलनाची धमकी वृत्तपत्रातून देऊ नये, हिंमत असेल तर समोर येऊन बोला. आम्ही जेवढी आंदोलने केली तेवढी यांनीही केली नसतील, असेही यावेळी माजी खासदार राणे म्हणाले.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत म्हणाले, पालकमंत्री नेहमी बरं आहे का म्हणतात आणि लोकांची फसवणूक करतात. त्यांना येथील विकासाचे काय पडले नसल्याचे सांगितले. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, संदिप कुडतरकर, दत्ता सामंत, विकास सावंत, डॉ. जयेंद्र परूळेकर, अस्मिता बांदेकर आदींनी आपले विचार मांडले. प्रास्ताविक रवींद्र म्हापसेकर यांनी केले. (प्रतिनिधी)
पोलीस छावणीचे स्वरूप : पोलिसांच्या भीतीने कार्यकर्ते पांगले
भाजपचे गाय, बैल तसेच इतर प्राण्यांवर प्रेम ऊतू जात आहे. त्यामुळेच जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष म्हणून पोपट आणून बसवला आहे, अशी टीका प्रमोद जठार यांच्यावर केली. नियोजन बैठकीत नारायण राणे यांचे अभिनंदन करणारे हेच आणि आता टीका करणारे हेच ही भाषा त्यांना कोठून येते, असा सवाल नीतेश राणे यांनी केला. काँग्रेसच्या आंदोलनामुळे सावंतवाडीला मंगळवारी पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. तब्बल पाच ते सहा पोलीस व्हॅन दोनशे ते अडीचशे पोलीस यामुळे काँग्रेसचे ग्रामीण भागातील कार्यकर्ते सावंतवाडीत येऊनसुध्दा काही तरी होईल, या भीतीने सर्वत्र पांगले होते.
केसरकरांनी फक्त गोव्याला जिंकले
आम्ही सावंतवाडीत आंदोलन करण्यापेक्षा गोव्यात आंदोलन केले पाहिजे होते. तर पालकमंत्री आम्हाला भेटले असते. ते प्रेमाने आम्हाला कधीच जिंकूच शकले नाहीत. महाराष्ट्रालाही नाही. त्यांनी फक्त प्रेमाने गोव्याला जिंकले, अशी खिल्लीही यावेळी आमदार नीतेश राणे यांनी केसरकरांची उडवली.
प्रांताधिकारी येईपर्यंत हलणार नाही : नीतेश राणे
सकाळी ११.३० च्या सुमारास माजी खासदार कार्यालया समोरून मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चा नगरपालिकामार्गे श्रीराम वाचन मंदिराकडे गेला. यावेळी पोलिसांनी बॅरिकेटस् लावले होते.
मोर्चा ज्यावेळी पालकमंत्र्यांच्या घराजवळ जाण्यास आला. त्यावेळी पोलिसांनी नियोजनात ठरल्याप्रमाणे अडवला. त्यानंतर आमदार नीतेश राणे व माजी खासदार नीलेश राणे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर पुन्हा मोर्चा पालकमंत्र्यांच्या घरावर जात असतानाच पोलिसांनी तो अडवला.
यावेळी आमदार नीतेश राणे यांनी प्रांताधिकारी जोपर्यंत येथे येत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला होता.