हत्तीच्या हल्ल्यानंतर ‘तिने’ दोन दिवस काढले जंगलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 11:57 PM2019-03-10T23:57:42+5:302019-03-10T23:57:48+5:30
दोडामार्ग : तालुक्यातील बांबर्डे येथील अश्विनी आप्पासाहेब देसाई (४५) ही महिला लाकडे आणण्यासाठी शुक्रवारी लगतच्या रानात गेली असता रानटी ...
दोडामार्ग : तालुक्यातील बांबर्डे येथील अश्विनी आप्पासाहेब देसाई (४५) ही महिला लाकडे आणण्यासाठी शुक्रवारी लगतच्या रानात गेली असता रानटी हत्तीने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. मात्र, जंगलमय भागात घडलेल्या या घटनेची माहिती कोणालाच नसल्याने ही महिला तब्बल दोन दिवस घटनास्थळीच पडून होती. अखेर तिची आर्त हाक अखेर रविवारी तुषार गावडे यांनी ऐकली आणि त्यांनी धावाधाव करून ग्रामस्थांच्या मदतीने तिला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून अधिक उपचारासाठी तिला गोवा येथे हलविण्यात आले.
हत्तींच्या उपद्र्रवामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हेवाळे, बांबर्डे, खराडी, बाबरवाडी परिसरातील शेतकऱ्यांचे जीवन हलाखीचे बनले आहे. उद्ध्वस्त होणाऱ्या शेती-बागायतीबरोबरच आता शेतकऱ्यांच्या जीवावरही बेतले आहे. अशीच घटना शुक्रवारी एका निराधार महिलेच्या बाबतीत घडली. बांबर्डे येथील अश्विनी देसाई ही महिला लाकडे आणण्यासाठी शुक्रवारी लगतच्या रानात गेली होती. तेथे रानटी हत्तीने तिच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात तिच्या डाव्या पायाला व पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. मात्र, ही जागा मनुष्यवस्तीपासून दूर असल्याने याबाबत कोणालाच माहिती मिळाली नाही. त्यामुळे अश्विनी ही त्याच अवस्थेत तब्बल दोन दिवस भुकेने व तहानेने विव्हळत पडली होती.
भूक आणि आणि तहानेने जीव व्याकुळ झाल्याने त्याच अवस्थेत घसरत घसरत अश्विनीने रविवारी काही अंतरावर असलेल्या नदीचा तीर गाठला आणि जीवाच्या आकांताने टाहो फोडला. लगतच्या केळी बागायतीत असलेल्या तुषार गावडे यांनी तिचा आवाज ऐकला आणि त्यांनी लागलीच त्या दिशेने धाव घेतली. वस्तुस्थिती पाहताच गावडेही काही वेळ सुन्न झाले. अखेर ग्रामस्थांच्या सहाय्याने त्यांनी अश्विनी हिला दोडामार्ग रुग्णालायात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने तिला बांबोळी-गोवा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.