इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर सिंधुदुर्गात अर्लट, डोंगरभागातील घराचे सर्व्हेक्षण सुरू
By अनंत खं.जाधव | Published: July 21, 2023 05:59 PM2023-07-21T17:59:30+5:302023-07-21T17:59:51+5:30
माथेरानचा व्हिडिओ आंबोली म्हणून व्हायरल, कारवाई होणार
सावंतवाडी : रायगड जिल्ह्यातील खालापूर इर्शाळवाडी येथील दुर्घटनेनंतर प्रशासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगरभागातील घराचे सर्व्हेक्षण सुरू केले आहे. काही ठिकाणी यापूर्वी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत तिथे आपत्कालीन यंत्रणा तयार ठेवण्यात आल्या आहे. जिल्ह्याला २४ जुलैपर्यंत अर्लट देण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी दिली. तसेच आपत्कालीन स्थितीचे चुकीचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर पोलिस योग्य ती कारवाई करतील असा इशाराही दिला.
सावंतवाडीत आज, शुक्रवारी चार तालुक्याची आपत्कालीन बैठक जिल्हाधिकाऱ्याच्या उपस्थित पार पडली. यावेळी पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छीद्र सोकटे, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात, कार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
इर्शाळवाडीसारखी परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही. मात्र, शिरशिंगे, असनिये, झोळंबे, कर्ली आदी गावाबाबत काळजी घेत असून अधिकाऱ्यांनी गावात जाऊन गावकऱ्यांशी चर्चा ही केली आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास शाळा महाविद्यालये तसेच आरोग्य यंत्रणेना विशेष काळजी घेण्याची सूचना करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व घाटमार्गावर बांधकाम विभागाकडून प्राथमिक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. घाटमार्गात अडथळा आल्यास यंत्रणा तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
माथेरानचा व्हिडिओ आंबोली म्हणून व्हायरल
माथेरान येथील व्हिडिओ हा आंबोलीचा असल्याचे सांगून व्हायरल करण्यात येत आहे. अशा व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार असून असे व्हिडिओ व्हायरल करण्यात येऊ नये या सर्व प्रकाराची पोलीस चौकशी करतील असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत अर्लट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत रेड अर्लट असणार आहे. त्यामुळे कामाशिवाय कोणी बाहेर पडू नये असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यानी यावेळी केले.