लाच प्रकरणानंतर सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या अनेक रंजक कथा येऊ लागल्या बाहेर
By अनंत खं.जाधव | Published: October 13, 2023 04:28 PM2023-10-13T16:28:12+5:302023-10-13T16:38:19+5:30
तक्रारदार म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी
सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुरूवारी घडलेल्या लाच प्रकरणानंतर या पोलिस ठाण्याच्या आतमध्ये चालेल्या एकापेक्षा एक अशा रंजक कथा बाहेर येऊ लागल्या आहेत. अंतर्गत हेवेदावे आणि त्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे झालेले दुर्लक्ष यामुळेच एखादा तक्रारदार आला तर सोन्याची अंडी देणारी कोंबडी आली अशीच काहिशी परिस्थिती सावंतवाडी पोलिस ठाण्याची झाल्यानेच एवढ्या मोठ्या रक्कमेची लाच घेण्याचे धाडस या अधिकाऱ्यांचे झाल्याचे बोलले जात आहे.
सावंतवाडी पोलीस ठाणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक आदर्श पोलिस ठाणे म्हणून ओळखले जायचे. पण ही ओळख आता मागील काहि महिन्यापासून पूसत चालली आहे. सावंतवाडीत अवैध धंद्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून ना कुणाला धाक राहिला आहे ना कुणाची भिती राहिली आहे. अवैध धंदेवाईकाचे सोबतीच काही पोलिस बनल्याने कारवाई कुणावर करायची असाच प्रश्न पडला आहे.
कारवाई केलीच तर कारवाई करणारा पोलिस अडचणीत अशा प्रकारचा समज पोलिसांमध्ये झाल्याने कोण रस्त्यावर उतरून कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाही. यामुळे सावंतवाडीत पोलिस ठाणे बदनाम होऊ लागले आहे. पोलिस कर्मचाऱ्यांमधील अर्तगत हेवेदावे वाढल्याने ते थांबवणे गरजचे असून पोलीस ठाण्याला सक्षम पोलिस अधिकाऱ्यांची गरज निर्माण झाली आहे.
प्रभारी अधिकाऱ्यांची खुर्ची फिरत्या रंगमंचासारखी
सावंतवाडी पोलिस ठाणे हे अधिकाऱ्यांची रंगीत खुर्ची बनली असून मागील साडेतीन वर्षात तब्बल पाच ते सहा अधिकारी या पोलिस ठाण्याचे प्रभारी बनले. तीन अधिकारी अडीच वर्षे राहिले तर उर्वरित तीन अधिकारी काही दिवसांसाठी तर काही महिन्यांसाठी सावंतवाडीत आले आणि गेले. त्यामुळे पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांची खुर्ची फिरत्या रंगमचासारखी झाल्याने कर्मचाऱ्यावर वचक कोण ठेवणार असा प्रश्न निर्माण होत आहे.
वाढते अवैध धंदे आणि पोलिस बनले मित्र
सावंतवाडीत सध्या अवैध धंद्याचे प्रमाण वाढले असून गोवा बनावटीच्या दारू विक्रीचे सावंतवाडी केंद्र बनले आहे. हे करत असताना पोलिसांचा आशिर्वाद महत्वाचा मानला जातो. त्यामुळे अवैध धंदेवाईकाचे पोलिसच मित्र बनल्याने कारवाई कुणावर करायची असाच प्रश्न पडू लागला आहे.
पोलिस अधीक्षकांनी साफसफाई मोहीम राबवण्याची गरज
सावंतवाडी पोलीस ठाण्याचा आदर्श कायम ठेवायचा असेल तर पोलिस अधीक्षकांनी च आता साफसफाई मोहीम राबविण्याची गरज असून झारीतील शुक्राचार्य शोधून काढून त्यांना खड्या सारखे बाजूला करण्याची गरज आहे. तरच सावंतवाडीत फोफावलेले अवैध धंदे आणि वाढती दादागिरी थांबविणे शक्य होणार आहे.