तारकर्लीच्या दुर्घटनेनंतर कोकणची बदनामी, उपद्रवी पर्यटकांची गरज नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 05:03 PM2022-06-04T17:03:23+5:302022-06-04T17:03:49+5:30

पर्यटनाबरोबरच आपली सामाजिक बांधिलकी जपा. ‘येवा कोकण आपलोच’ आसा म्हणून मालवणी माणूस तुम्हाला साद घालतच आहे. मात्र, बदनामीचे षडयंत्र आखू नका.

After the Tarkarli tragedy Konkan infamous, annoying tourists are not needed | तारकर्लीच्या दुर्घटनेनंतर कोकणची बदनामी, उपद्रवी पर्यटकांची गरज नाही

तारकर्लीच्या दुर्घटनेनंतर कोकणची बदनामी, उपद्रवी पर्यटकांची गरज नाही

Next

महेश सरनाईक

तारकर्लीच्या दुर्घटनेपासून सध्या कोकणावर टीका करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर फार फिरत आहेत. घाटमाथ्यावरील काही बोरू बहाद्दूर आपल्याला वाटेल तसे खमंग लिखाण करून संपूर्ण पर्यटन बदनाम करत आहेत. पर्यटनाला जाताना आपण वैयक्तिक काळजी घ्यायची नाही. कुठलीही बंधने पाळायची नाहीत. तुला काय समजते ? म्हणून आवर घालणाऱ्यांना उडवून लावायचे आणि आता दुर्घटना घडल्यानंतर संपूर्ण व्यवस्था किंवा पर्यटन कसे धोकादायक आहे, असे मांडून कोकणची खासकरून तारकर्ली, मालवण आणि रत्नागिरीतील गणपतीपुळे, मालगुंड किनाऱ्यावरील पर्यटनाची बदनामी करायची. हे आता कुठेतरी थांबले पाहिजे. कारण दुर्घटना ही दुर्घटना असते, ती काय कोण मुद्दामहून करत नाही, याची जाण ठेवावी.

कोरोनाच्या कालावधीत दोन वर्षे पर्यटनाचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे येथील सुशिक्षित बेरोजगारांनी कर्ज काढून सुरू केलेले व्यवसाय पूर्णपणे फसले आहेत. कर्जबाजारी होण्याची पाळी या व्यावसायिकांवर आलेली आहे. मात्र, त्यातून सुटका होण्यासाठी शासन पातळीवर कोणतेही प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्राधान्याने शासनावरच टाकली पाहिजे.

कारण पर्यटकांना ज्या सुविधा शासनाकडून द्यायच्या आहेत. पायाभूत सुविधा निर्माण करायच्या त्या होत नाहीत. त्यात काही अपुऱ्या सामग्रीच्या आधारावर येथील पर्यटन व्यावसायिक हा डोलारा पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. कारण त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नाही. अनेक समस्या आहेत. त्या समस्या सुटणाऱ्यादेखील नाहीत. मात्र, त्याबाबतचे रडगाणे गात राहिल्यास बँकेचा हप्ता कसा भरायचा? असा प्रश्नदेखील त्यांच्यासमोर आहे.

समुद्री क्रीडाप्रकारात प्रत्येकवेळी लाईफ जॅकेट प्रत्येकाने घालणे कायद्याने बंधनकारक आहे. तसे ते मनुष्यासाठी  महत्त्वाचे आहे. त्यामुळे लाईफ जॅकेट घालूनच समुद्रसफारी करणे बंधनकारक आहे. जर कोणी ते वापर करत नसेल किंवा एखाद्या बोटीवर नसेल तर मग तशा बोटीची किंवा बोट मालकाची तक्रार एकाही पर्यटकाने कधी कोणाकडे केली नाही. आता दुर्घटना घडल्यानंतर अनेक जण जागे झाले आहेत आणि ते बेछूट आरोप करून उगाचच बदनामी करीत आहेत.

डबक्यात पोहणाऱ्याला लहरी समुद्र जो रोज आपले रूप बदलतो, ते सुद्धा डबकेच वाटते व पर्यटक त्यात उतरतो. स्थानिकांच्या सूचना ऐकत नाही किंवा ऐकून न ऐकल्यासारखे करतात. सावधगिरीचा इशारा त्यांना दिलेला चालत नाही, दारू पिणे व हुल्लडबाजी करणे यातच पर्यटकांना पर्यटन केल्याचा आनंद वाटतो.

पर्यटक मित्रांनो तुम्ही कोकणात गेला नाहीत तरी कोकणकरांचे काहीही नुकसान होणार नाही. उलट फायदाच होईल. तुम्हाला समुद्राचे आकर्षण आहे. तुम्हाला कोकणात जायचे आहे. तुम्हाला ताजे मासे, कोकणी मेवा खायचा आहे म्हणून तुम्हाला कोकणची गरज आहे. त्यामुळे यापुढे लक्षात ठेवा जर तुम्हाला कोकण हवे असेल तर कोकणी लोकांना मान द्या व त्यांच्या सूचना ऐकून तंतोतंत पालन करा व पर्यटनाचा आनंद घ्या.

अन्यथा जाऊच नका, उपद्रवी पर्यटकांची कोकणाला गरज नाही. यापुढे कोकणात जायचे असेल तर तेथील स्थानिक युवक योग्य मार्गदर्शन करून तुम्हाला कोकण फिरवतील. त्यांना त्याचा योग्य मोबदला देऊन त्यांची मदत घ्या, अधिक माहितीसाठी संपर्क करा. केवळ कोकणाला दोष देऊन आपली अक्कल पाजळून काही होणार नाही. तर पर्यटनाबरोबरच आपली सामाजिक बांधिलकी जपा. ‘येवा कोकण आपलोच’ आसा म्हणून मालवणी माणूस तुम्हाला साद घालतच आहे. मात्र, बदनामीचे षडयंत्र आखू नका.

Web Title: After the Tarkarli tragedy Konkan infamous, annoying tourists are not needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.