तलाठ्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक, ऐनारीवासीय संतप्त, कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 04:40 PM2019-09-19T16:40:40+5:302019-09-19T16:43:34+5:30
पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास भुईबावडा तलाठी यु. जी. कदम हे टाळाटाळ करीत आहेत. याशिवाय ते ग्रामस्थांशी उद्धटपणे वागत असून त्यांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी ऐनारी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे. दरम्यान, या तलाठ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी केली आहे.
वैभववाडी : पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास भुईबावडा तलाठी यु. जी. कदम हे टाळाटाळ करीत आहेत. याशिवाय ते ग्रामस्थांशी उद्धटपणे वागत असून त्यांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी ऐनारी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे. दरम्यान, या तलाठ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी केली आहे.
ऐनारी हे गाव भुईबावडा सजामध्ये येते. पूरस्थितीमुळे ऐनारी येथील अनेक घरे, गोठे आणि काजू बागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी ग्रामस्थ तलाठी कदम यांच्याकडे आग्रह धरीत असतात. परंतु, पंचनामे करणार नाही. काही करायचे ते करा अशा प्रकारची उद्धट उत्तरे ते ग्रामस्थांना देतात. गेली दोन वर्षे कदम या गावात असून ग्रामस्थांशी त्यांचे वर्तन चांगले नाही.
त्यामुळे २०१७ मध्ये त्यांची गावातून बदली करावी असा ठराव ऐनारी ग्रामसभेत करण्यात आला होता. आताही आक्रमक भूमिका घेत या तलाठ्याची तत्काळ गावातून उचलबांगडी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे. दरम्यान, यासंदर्भात पालकमंत्री केसरकर आणि जिल्हाधिकारी यांना शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, तलाठी कदम यांच्यामुळे ऐनारी गावातील अनेक कामे रखडली आहेत. पूरामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ पंचनामे करून आधार देण्याची गरज असताना कदम हे तेथील लोकांना आणखी त्रास देत आहेत. तरी त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
खात्री करून निर्णय घेऊ : तहसीलदार
ऐनारी ग्रामस्थांनी आपल्याकडे निवेदन दिलेले आहे. ग्रामस्थांच्या निवेदनाची खात्री करून वरिष्ठांच्या सूचनेनुसार योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे तहसीलदार रामदास झळके यांनी स्पष्ट केले.