सांस्कृतिक केंद्राच्या कामासाठी आंदोलनात्मक पवित्रा

By admin | Published: November 10, 2015 10:29 PM2015-11-10T22:29:21+5:302015-11-11T00:13:34+5:30

आम्ही चिपळूकरचा लढा : पारावर रंगली दिवाळी पहाट; सांस्कृतिक केंद्राची इमारत नादुरूस्त; नाट्यरसिकांमध्ये नाराजीचा सूर; निधीही मंजूर

Agitative holy for the work of cultural center | सांस्कृतिक केंद्राच्या कामासाठी आंदोलनात्मक पवित्रा

सांस्कृतिक केंद्राच्या कामासाठी आंदोलनात्मक पवित्रा

Next

चिपळूण : गेली १० वर्षे बंद पडलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकरणाचे काम नगरपरिषद प्रशासनातर्फे सुरु करण्यात आले आहे. मात्र, गेले काही दिवस हे काम थंडावल्याने मुदतीत काम होणार अथवा नाही, याबाबत आम्ही चिपळूणकरतर्फे आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाणार आहे. सन २००५मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राची इमारत नादुरुस्त झाली. गेली १० वर्षे शहरवासीयांसाठी शहरात एकही करमणूक केंद्र नाही. त्यामुळे नाट्य व अन्य मनोरंजनात्मक बाबींपासून चिपळूणवासीय वंचित राहिले आहेत. सांस्कृतिक केंद्र सुरू व्हावे, यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून नगर परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. सांस्कृतिक केंद्राचे काम सुरु व्हावे म्हणून माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांनी प्रयत्न सुरु केले. या सांस्कृतिक केंद्रासाठी निधीही मंजूर झाला आहे. सांस्कृतिक केंद्र लवकरात लवकर उपलब्ध व्हावे, याकरिता आम्ही चिपळूणकर संस्थेतर्फे नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सांस्कृतिक केंद्र नसल्याने आम्ही चिपळूणकरतर्फे पारावर विविध कार्यक्रमही घेण्यात आले. या माध्यमातून जनजागृती झाली. पावसाळ्यापूर्वी सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र, हे काम संथ गतीने सुरु असल्याने नाट्य रसिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. केंद्राचे काम ठेकेदाराला दिलेल्या मुदतीत होणार अथवा कसे, यामध्ये शंका निर्माण होत असल्याने आम्ही चिपळूणकरतर्फे पुन्हा नगर परिषदेसमोर केंद्राचे काम जलद गतीने व्हावे, यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. आज मंगळवारी दिवाळी पहाट संगीत मैफल हा कार्यक्रम पारावरच घेण्यात आला. चौकटच्या कलाकारांनी सादर केलेल्या प्रत्येक गीताला टाळ्यांची साद देत रसिक या कलाकारांना दाद देत होते. कार्यक्रमाच्या शेवटी चौकटच्या सर्व कलाकारांचा आम्ही चिपळूणकरतर्फे भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सूर आनंदघन या कवी मंगेश पाडगावकर यांच्या गीताने स्वाती कानडे आणि सायली कानडे यांनी केली. कार्यक्रमात आनंद पाटणकर, स्वरा केळकर, उदय गोरे, आशुतोष चितळे यांनी गीत सादर केली. हार्मोनियमची साथ हर्षल काटदरे यांनी, तर तबल्याची साथ उन्मेष जाधव, सिंंथेसायझर सुरेश काजारी, ताल-वाद्याची साथ प्रमोद जाधव, निरंजन केतकर यांनी दिली. मीरा पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)


कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आम्ही चिपळूणकरतर्फे रसिकांना कार्यक्रमाला येताना सोबत एक पणती घेऊन यावे, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला सर्व रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या पणत्यांच्या उजेडाने गेली दहा वर्षे अंधारात राहिलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचा परिसर दिवाळीच्या पहिल्या पहाटे उजळून निघाला. एक प्रकारे चिपळूणकर कलाकारांच्या सुरांनी आणि रसिकांनी आणलेल्या दिव्यांच्या उजेडाने इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचा अंधारलेला परिसर पुन्हा एकदा प्रकाशात येण्याची चिन्हे दिसू लागली.



गेली १० वर्षे बंद पडलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या नुतनीकरणाचे काम.
गेले काही दिवस केंद्राचे काम थंडावल्याने मुदतीत काम नाही.
केंद्राचे काम जलद गतीने होण्यासाठी नगर परिषदेसमोर आंदोलन.
कलाकारांच्या प्रत्येक गीताला टाळ्यांनी दिली साद.

Web Title: Agitative holy for the work of cultural center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.