कृषी यांत्रिकीकरण उपअभियान; ९५ लाखांचा निधी मंजूर

By admin | Published: December 31, 2016 11:04 PM2016-12-31T23:04:08+5:302016-12-31T23:04:08+5:30

सिंधुदुर्गातील २०१ शेतकऱ्यांची निवड : ४२ लाखांचा निधी उपलब्ध

Agricultural mechanization sub-campaign; 95 lakhs approved | कृषी यांत्रिकीकरण उपअभियान; ९५ लाखांचा निधी मंजूर

कृषी यांत्रिकीकरण उपअभियान; ९५ लाखांचा निधी मंजूर

Next

सिंधुदुर्गनगरी : कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत सन २०१६-१७ मध्ये शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कृषी अवजारे (यंत्र सामग्री)चा लाभ देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सोडत पद्धतीने जिल्ह्यातील २०१ शेतकऱ्यांची निवड केली आहे. या योजनेसाठी शासनाने ९५ लाखांचा निधी मंजूर केला असून, यापैकी ४२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
शेतकऱ्यांना स्वत:च्या मालकीची यंत्रे खरेदी करता यावीत, या आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने त्याला शेती व्यवसायात प्रगती साधता यावी यासाठी प्रोत्साहन अनुदान म्हणून शासनाने सन २०१५-१६ पासून केंद्र पुरस्कृत कृषी उन्नती योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार ट्रॅक्टर, पॉवरटिलर, टिपर, ग्रासकटर, आदी शेतीविषयक अवजारांसाठी प्रवर्गनिहाय मागणीनुसार अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. यात अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना यंत्राच्या किमतीच्या ३५ टक्के अनुदान दिले जाणार आहे, तर इतर शेतकऱ्यांना २५ टक्के, अनुसूचित जाती-जमाती, अल्पभूधारक ५० टक्के आणि अल्पभूधारक इतर शेतकरी यांना ४० टक्के अशाप्रकारे अनुदान दिले जाणार आहे.
दरम्यान, प्रस्ताव मंजूर करण्यात आलेल्या उपकरणांची किंमत सुमारे सहा कोटींच्या घरात जाते. यापैकी सरासरी ५० टक्के अनुदानाप्रमाणे अंदाज केल्यास किमान तीन कोटी रुपयांची आवश्यकता आहे. मात्र, शासनाने केवळ ९४ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. त्यामुळे उर्वरित अनेक प्रस्ताव प्रलंबित राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)


गतवर्षी १५० प्रस्ताव मंजूर
या योजनेचे सन २०१५-१६ या पहिल्याच वर्षी शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला ६४ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले होते. त्याअंतर्गत एकूण ७५० प्रस्ताव कार्यालयाकडे प्राप्त झाले होते. यापैकी पहिला येईल त्याला प्राधान्य या पद्धतीने १५० प्रस्ताव मंजूर करून त्यांना लाभ देण्यात आला. मात्र, या निकषात शासनाने यावर्षी बदल करत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीला सोडत पद्धतीने प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार दिले आहेत.


वेरळ येथील बचत गटाला शेती अवजारे बँक मंजूर
या योजनेंतर्गत भाडेतत्त्वावरही शेतकऱ्यांना शेती अवजारे उपलब्ध व्हावीत यासाठी ४० टक्के अनुदानावर शेती अवजारे बँक उपलब्ध करून देण्याच्या शासन आदेशानुसार यावर्षी जिल्ह्यातून प्राप्त प्रस्तावांमधून मालवण तालुक्यातील आधार स्वयंसहाय्यता बचत गट वेरळ यांनाही शेती अवजारे बँक मंजूर झाली आहे. या बँकेमार्फत शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर अवजारांचा पुरवठा करण्यात येणार आहे.


यावर्षीसाठी २०१ प्रस्तावांची निवड
सन २०१६-१७ साठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाभरातून ९०८ शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे अर्ज केला होता. या प्रस्तावांमधून झालेल्या सोडतीत प्रवर्गनिहाय २०१ प्रस्तावांची निवड करण्यात आली आहे, तर १७३ प्रस्ताव निवड करून प्रतीक्षा यादीवर ठेवण्यात आले आहेत. निवड करण्यात आलेल्यांना ट्रॅक्टर, पॉवरटिलर, टिपर, ग्रासकटर, चाफकटर, चेन, सॉ मशीन, मळणी यंत्र, पॉवर स्प्रे, आदी यंत्रे दिली जाणार आहेत.

Web Title: Agricultural mechanization sub-campaign; 95 lakhs approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.