दत्तक गोळवली गावचा बेसलाईनसह कृषी सर्व्हे पूर्ण
By admin | Published: March 25, 2015 09:25 PM2015-03-25T21:25:16+5:302015-03-26T00:12:54+5:30
पंचायत समिती : ऊर्जामंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन
मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील गोळवली हे केंद्रीय उर्जामंत्री पियुष गोयल यांनी दत्तक घेतल्यानंतर या गावचा कृषी सर्व्हे व बेसलाईन सर्व्हे तयार करण्यात आला आहे.पंचायत समितीच्या कृषी विभागाच्यावतीने गावातील शेतकऱ्यांच्या मागण्यांची सुची तयार करुन ती गोयल यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. गोळवली हे गाव दत्तक घेतल्यानंतर पियुष गोयल या गावाच सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. गोयल यांनी शेतकऱ्यांच्या विकासाच्यादृष्टीने असणाऱ्या मागण्यांची माहिती संकलीत करुन ती पाठवण्याची सूचना केली होती.याप्रमाणे पंचायत समिती कृषी विभागातर्फे गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला व शेतकऱ्यांकडून माहिती गोळा करण्यात आली. यामध्ये तीन शेतकऱ्यांनी बायोगॅस पाहिजे, अशी मागणी केली तर, सहा शेतकरी गांडुळ खतनिर्मितीसाठी आग्रही आहेत. सौर कंदिलासाठी ५६ शेतकरी, पंप पाईप लाईनसाठी २७ शेतकरी, कंपोस्ट खतासाठी ४१ शेतकरी, व विशेष घटक योजनेसाठी २३ शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. दोन हेक्टर क्षेत्रामध्ये आले लागवड, दोन हेक्टरमध्ये हळद लागवड व त्याची दोन प्रात्यक्षिके, चारसूत्री भात लागवडीची २३ प्रात्यक्षिके गावात घेतली जाणार आहेत. त्याचबरोबर गावातील शेतकऱ्यांचा दोन टप्प्यात सहली अभ्यासदौरा काढण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला, झाराप व पिंगुळी अशी सहल नेली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी व हिवरे बाजार अशी सहल काढली जाणार आहे. त्यातून शेतकऱ्यांच्या विकासाचा मार्ग तयार व्हावा, असे अपेक्षित आहे. (वार्ताहर)
गोयल यांनी विकासात्मक मागण्यांची माहिती संकलित करण्याची केली होती सूचना.
कृषी विभागातर्फे गावातील शेतकऱ्यांशी संवाद.
शेतकऱ्यांच्या दोन टप्प्यात कृषी सहली.