कृषी अधिकाऱ्यांचीच सभेला दांडी

By admin | Published: April 1, 2015 10:52 PM2015-04-01T22:52:51+5:302015-04-02T00:46:57+5:30

राजापूर पंचायत समिती : शुक्लकाष्टच्या धास्तीने फिरकलेच नाहीत

Agriculture officials held a meeting for Dandi | कृषी अधिकाऱ्यांचीच सभेला दांडी

कृषी अधिकाऱ्यांचीच सभेला दांडी

Next

राजापूर : येथील तालुका कषी कार्यालयातील कथित लॅपटॉप पळवापळवीचे प्रकरण चांगलेच गाजत असून, आता चौकशीचे शुक्लकाष्ट आपल्या पाठीशी लागेल, या भीतीने हादरलेले कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पंचायत समितीच्या मासिक बैठकीलाच दांडी मारली. हा सारा प्रकार घडत असतानाच पंचायत समिती सदस्यांपैकी कुणीच त्या विषयावर ब्र न काढल्याने आता सदस्यदेखील त्या प्रकाराला पाठीशी घालीत तर नाहीत ना? या शंकेला बळकटी मिळाली आहे.
दोन दिवसांपूर्वी तालुका कृषी कार्यालयांतर्गत लॅपटॉप पळवापळवीचे प्रकरण उघडकीस आले. एका कृषी सहाय्यकाने कार्यालयीन कामकाजाचा लॅपटॉप कुणाला न सांगता तेथून अन्यत्र पळवून नेल्याची लेखी तक्रार राजापूर कृषी मंडल विभाग १चे मंडल अधिकारी ए. आर. कावतकर यांनी तालुका कृषी विभागाचे अधिकारी चंद्रमणी मेश्राम यांच्याकडे केली. त्यानंतर या प्रकरणात पुढे रंगत वाढत गेली व त्यातूनच लॅपटॉपवरुन चांगलीच जुंपली होती. आता या प्रकरणाचे पडसाद राजापूर पंचायत समितीच्या बैठकीत नक्की उमटतील व प्रकरण आपल्यावरच शेकेल शिवाय सर्वांसमक्ष जाबदेखील द्यावा लागेल, याची जाणीव असलेल्या कृषी विभागाच्या तालुका अधिकाऱ्यांसह अन्य अधिकारी व कर्मचारी यापैकी कुणीही या बैठकीला उपस्थित नव्हता.
लॅपटॉप पळवापळवीचे प्रकरण गाजत असताना उपस्थित पंचायत समिती सदस्यांपैकी याबाबत कुणीही हा मुद्दा उपस्थित केला नाही. त्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता सदस्यदेखील त्या प्रकरणी कुणाला पाठीशी तर घालीत नाहीत ना? अशी चर्चा सुरु होती.
दरवेळेप्रमाणे राजापूर पंचायत समितीच्या मासिक बैठकीला अनेक खात्यांचे प्रमुख काही ना काही कारणे पुढे करत अनुपस्थित राहिले. त्यामध्ये शिक्षण, सार्वजनिक, बांधकाम, महावितरण, ग्रामीण पाणी पुरवठा आदी विभागांचा समावेश होता. काही शाळांतील वर्गाची संख्या वाढवण्याबाबतचा मुद्दा उपस्थित होताच प्रथम परिपूर्ण शिक्षक द्या, मगच वर्ग वाढवा, अशी भूमिका माजी सभापती कमलाकर कदम यांनी घेतली. त्याला सत्ताधारी सेनेचे सदस्य दीपक नागले यांनी आक्षेप घेतला. यावरुन त्या दोघांत जुगलबंदी पाहावयास मिळाली तर ठेकेदार मिळाल्याशिवाय कामाचे बिल काढू नका, असे गटविकास अधिकारी सांगतात, असा आरोप माजी उपसभापती भाग्यश्री लाड यांनी केल्याने गटविकास अधिकाऱ्यांसमवेत त्यांची शाब्दिक चकमक उडाली. बैठकीनंतरही त्या दोघांत पुन्हा याच विषयावर जुंपली होती.
तालुक्यात पाणीपट्टी, घरपट्टी यांसह आता विभागातील वसुली १०० टक्के झाली आहे, तर तालुक्यात जिल्हा परिषद शाळा, तळगाव क्र.२ व कोंढेतड क्र.२ यांना आदर्श शाळा म्हणून निवडण्यात आल्याची माहिती सभागृहाला देण्यात आली. शिक्षण विभागाच्या कोलमडलेल्या कारभारावर चिंता व्यक्त करण्यात आली. शाळेतील किचन शेडचा विषयही चांगलाच चर्चेत आला. किचन शेडचे काम पूर्ण झाल्याशिवाय त्यांचे पैसे देऊ नये, असा निर्णय घेण्यात आला. तालुक्यात ताम्हाने धनगरवाडी व मोरोशी या गावांना पाणीटंचाई जाणवत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Agriculture officials held a meeting for Dandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.