चांदा ते बांदा अंतर्गत 67 गटांना कृषि औजारांचा पुरवठा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 01:08 PM2019-07-27T13:08:12+5:302019-07-27T13:18:40+5:30
चांदा ते बांदा अंतर्गत कृषि विभागामार्फत जिल्ह्यातील 67 गटांना कृषि यांत्रिकीकरणामधून विविध आधुनिक कृषि औजाराचं वितरण होईल, याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपल शेती उत्पन्न वाढवून आर्थिक विकास साधावा असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात केले.
सिंधुदुर्ग: चांदा ते बांदा अंतर्गत कृषि विभागामार्फत जिल्ह्यातील 67 गटांना कृषि यांत्रिकीकरणामधून विविध आधुनिक कृषि औजाराचं वितरण होईल, याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपल शेती उत्पन्न वाढवून आर्थिक विकास साधावा असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात केले.
चांदा ते बांदा योजना व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सावंतवाडी येथील नगरपरिषदेच्या बॅ. नाथ पै. सभागृहात आयोजित शेतकरी मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, वेंगुर्ला पंचायत समितीचे सभापती मोरजकर, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगांवकर, माजी आमदार पुष्पसेन सावंत, प्रसाद देवधर, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरूणकुमार झा, उपविभागीय कृषी अधिकारी अजित अडसुळ, सी.जी. बागल, राजन पोकळे आदी उपस्थित होते.
चांदा ते बांदा कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत बँक ऑफ इंडियाकडे 75 टक्के अनुदानाचा हिस्सा जमा करण्यात येईल असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांनी यासाठी कोणतेही तारण देण्याची गरज नाही यांत्रिकीकरणाद्वारे उपलब्ध होणारी औजारे तारण म्हणून राहतील.
ते पुढे म्हणाले, शेतीला पुरक व्यवसायांची जोड मिळाली पाहिजे यासाठी चांदा ते बांदा अंतर्गत एक हजार शेतकऱ्यांना दुधाळ गाई-म्हैशींचा पुरवठा तर पाच हजार कुटुंबाना कोंबड्या पुरविण्यात येणार आहेत. या योजनांचांही शेतकरी व महिलांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी प्रमुख वक्ते फोंडा कृषी संशोधन केंद्राचे डॉ. विजयकुमार शेट्ये यांनी भात पिकांची लागवड व उत्पादन क्षमता वाढविणे याबाबत सविस्तर माहिती दिली. भात पिकांची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी भात शेतीतील लावणी पासून तोडणी पर्यंतची सर्व कामे यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने करण आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपविभागीय अधिकारी डॉ.सी.जी.बागल यांनी चांदा ते बांदा योजनेअंतर्गत कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती यावेळी दिली. श्री भात लागवड पध्दत, दुबार पिक, फळझाड लागवड, आंबा पुनरूज्जीवन आदी योजनांची माहिती दिली.
यावेळी चांदा ते बांदा योजनेतील काजू कलमे लागवड, मिरी लागवड शेतकऱ्यांना परवाना पत्रे देण्यात आली. या मेळाव्यात आमदार वैभव नाईक, डॉ. प्रसाद देवधर, माजी आमदार पुष्पसेन सावंत, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगांवकर यांचीही समयोचित भाषणे झाली.
प्रारंभी प्रास्ताविकात प्रभारी अधिक्षक कृषि अधिकारी एस.एन.म्हेत्रे यांनी सिंधुदुर्ग भात उत्पादनात आघाडीवर आहे असे सांगून ही भात उत्पादन क्षमता यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने वाढविण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.
गतवर्षी श्री पध्दतीने एक हजार हेक्टर क्षेत्रावर हेक्टरी 6 हजार 500 रूपये अनुदान देऊन भात लागवड केली आहे. यंदाच्या खरीप हंगामात 2 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर श्री पध्दतीने भात लागवड नियोजित असल्याची माहिती त्यांनी दिली.
या शेतकरी मेळाव्यास जिल्ह्यातून शेतकरी, शेतकरी कंपनीचे सदस्य, बचत गटांचे प्रतिनिधी, विविध कार्यकारी सेवा संस्था, ग्रामपंचायतीचे सदस्य आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.