‘त्या’ नौकांवर ‘एआयएस’चा अंकुश
By admin | Published: June 16, 2015 11:35 PM2015-06-16T23:35:00+5:302015-06-17T00:42:05+5:30
प्रविण सौदाणे : सागरी हद्द ओलांडून होणारी मच्छिमारी
मालवण : सागरी हद्दीच्या कारणावरुन प्रत्येक राज्यातील वाद निर्माण होऊन मोठा संघर्ष पेटतो. त्यामुळे परराज्यातील संघर्ष टाळण्यासाठी केंद्र शासनाने देशभरातील १५ मीटर व त्यापेक्षा जास्त लांबीच्या नौकांना ‘एआयएस’ हे उपकरण बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपकरणामुळे मच्छिमारी नौकांचे लोकेशन समजणे सुलभ होणार आहे, अशी माहिती रत्नागिरी तटरक्षक व्यवस्थापन अधिकारी प्रविण सौदाणे यांनी मालवण येथे बोलताना दिली.
मालवणातील मच्छिमारांसाठी तटरक्षक दलाच्यावतीने शोध व बचावकार्याचे आयोजन मालवण पोलीस वसाहत येथील गणेश मंदिर सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना प्रविण सौदाणे बोलत होते.
यावेळी मालवण पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले, मत्स्य परवाना अधिकारी सुरेंद्र गावडे, सागरी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र साळुंखे, सागरी पोलीस अधिकारी प्रकाश सारंग, अनिल साठे, सिंधुदुर्ग जिल्हा श्रमजीवी रापण संघाचे सचिव दिलीप घारे, मालवण तालुका श्रमिक मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष छोटू सावजी, बाबी जोगी व इतर उपस्थित होते.
मालवणच्या समुद्रात अलिकडेच गोवा व कर्नाटक येथील हायस्पीड पर्ससीन टॉलर्सनी धुमाकूळ घातल्याने मच्छिमारांमध्ये संघर्ष पेटला होता. असे अतिक्रमण सातत्याने होत असून यामुळे स्थानिक मच्छिमारांचे नुकसान होत असल्याने शासन याला लगाम घालणार का? असा प्रश्न यावेळी दिलीप घारे यांनी उपस्थित केला. घारे यांच्या प्रश्नावर उत्तर देताना प्रविण सौदाणे यांनी शासनाने १५ मीटर किंवा त्यापेक्षा जास्त लांबीच्या मच्छिमारी नौकांवर आॅटोमॅटिक आयडेंटीफिकेशन सिस्टिम (एआयएस) हे उपकरण बसविणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. या उपकरणामुळे एखादी नौका कोणत्या सागरी हद्दीत आहे. याचे लोकेशन मिळणार आहे. यामुळे सागरी हद्द ओलांडून नियमभंग करुन मासेमारी करणाऱ्या नौकेवर कारवाई करणे सुलभ होणार आहे. असे सौदाणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नौकांची नोंद ठेवा
केंद्र सरकारने काही कडक धोरणे निश्चित केली असून निकामी झालेल्या नौकांच्या नावांवरही डिझेल कोटा उचलला जात असल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात किती नौका मच्छिमारी करतात याची नोंद करण्याचे आदेश शासनाने मत्स्य विभागाला दिले आहेत, असेही तटरक्षक व्यवस्थापन अधिकारी प्रवीण सौदाणे यांनी सांगितले.