आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐश्वर्या सावंत
By admin | Published: December 24, 2015 12:11 AM2015-12-24T00:11:39+5:302015-12-24T00:37:17+5:30
कर्नाटकबरोबरच्या अंतिम सामन्यात ऐश्वर्याने पहिल्या डावात तिने नाबाद तीन मिनीटे २० सेकंद व दुसऱ्या डावात तीन मिनीटे खेळ करीत एक गडी बाद केला होता.
रत्नागिरी : बाराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा आसाम - गुवाहाटी येथे होणार आहेत. स्पर्धेतील खो-खो खेळाकरिता भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी निवडण्यात आलेल्या प्राथमिक संघात गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या ऐश्वर्या सावंत हिची निवड करण्यात आली आहे.प्राथमिक संघामध्ये महाराष्ट्रातील पाचजणांचा समावेश असून, त्यामध्ये ऐश्वर्या सावंतची निवड झाली आहे. ऐश्वर्या भारतीय संघापर्यंत मजल करणारी कोकणातील पहिली खेळाडू आहे. सोलापूर येथे झालेल्या राष्ट्रीय पुरुष व महिला गटाचा खो-खो स्पर्धेसाठी या संघाची निवड करण्यात आली होती. दोन्ही गटाचे विजेतेपद महाराष्ट्र संघाने पटकावले. महाराष्ट्राच्या महिला संघात ऐश्वर्या सावंत हिने रत्नागिरीचे प्रतिनिधीत्व केले. कर्नाटकबरोबरच्या अंतिम सामन्यात ऐश्वर्याने पहिल्या डावात तिने नाबाद तीन मिनीटे २० सेकंद व दुसऱ्या डावात तीन मिनीटे खेळ करीत एक गडी बाद केला होता. या स्पर्धेतील सर्वोत्कृ ष्ट खेळाडूला देण्यात येणाऱ्या राणी लक्ष्मीबाई पुरस्काराच्या स्पर्धेत ऐश्वर्या हिचे नाव घेण्यात येत आहे. ऐश्वर्याच्या उत्कृ ष्ट कामगिरीबद्दलच तिची निवड भारतीय संघामध्ये झाली आहे. उस्मानाबाद, अहमदनगर, ठाणे व रत्नागिरीतील खेळाडूंची निवड संघामध्ये करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षात ऐश्वर्याने दहा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राकडून प्रतिनिधीत्व केले. त्यात तीन खुल्या गटातील राष्ट्रीय स्पर्धांचा समावेश आहे. २००९-१० ला तिची पायका स्पर्धेसाठी निवड झाली. त्यानंतर तिची विजयाकडची वाटचाल सुरुच राहिली. यावर्षी झालेल्या राष्ट्रीय १९ वर्षाखालील शालेय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राची कर्णधार होती.
प्राथमिक संघातील महिलांचे शिबिर गुजरात, गांधीनगर येथे होणार आहे. २८ ते १८ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या शिबिरातून १५ जणांचा अंतिम संघ निश्चित करण्यात येणार आहे. ऐश्वर्या २६रोजी प्रशिक्षण शिबिरासाठी गुजरातकडे रवाना होणार आहे. दक्षिण आशियाई स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूतान या देशाचे खो-खो संघ सहभागी होणार आहेत. सध्या ऐश्वर्या अभ्यंकर - कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात १२ वीच्या वर्गात शिकत आहे. भारतीय संघामध्ये निवड झाल्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. (प्रतिनिधी)