आकाश-पाताळ एक करेल, पण सेना जनतेची साथ सोडणार नाही - सुभाष देसाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 03:43 PM2018-03-11T15:43:26+5:302018-03-11T15:43:26+5:30
शिवसेनेला कोकणाने बरेच काही दिले आहे. तसे शिवसेनेनेही कोकणला दिले आहे.
सिंधुदुर्ग : शिवसेनेला कोकणाने बरेच काही दिले आहे. तसे शिवसेनेनेही कोकणला दिले आहे. त्यामुळे शब्द आणि विश्वास हे नाते निर्माण झाले आहे. कोकणाने पाच खासदार दिले. तर शिवसेनेने सात मंत्री कोकणातील दिले आहेत. त्यामुळे भविष्यात आमचे लक्ष विधानसभा हेच असणार आहे. त्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने आलेला निधी, केलेले विकासकाम जनतेपर्यंत पोहोचवावे. शिवसेना आकाश-पाताळ एक करेल, पण कधीही जनतेची साथ सोडणार नाही. आम्ही सत्तेत खारीच्या वाट्यासारखे असलो तरी जनतेसाठी रात्रंदिवस काम करण्याची प्रेरणा शिवसेनाप्रमुखांकडून घेतली आहे, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील प्रमुख शिवसैनिकांची बैठक शनिवारी पार पडली. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, बाबुराव धुरी, बाळा दळवी, दोडामार्ग सभापती गणपत नाईक, वेंगुर्ले सभापती यशवंत परब, सावंतवाडी संपर्कप्रमुख शैलेश परब, राजू नाईक, शब्बीर मणियार आदी उपस्थित होते.
सर्वात जास्त निधी आम्ही आणला
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्गच्या इतिहासात कोणीही निधी आणला नाही तेवढा आम्ही आणला आहे. विकासकामे करा, सिंधुदुर्गचे नाव मोठे करा, हा जिल्हा स्वच्छ व सुंदर जिल्हा होऊ दे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार वैभव नाईक, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, प्रकाश परब यांनी विचार मांडले. मंत्री देसाई व केसरकर यांचे स्वागत तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, राजू नाईक व शब्बीर मणियार यांनी केले. राष्ट्रगीताने बैठकीचा समारोप करण्यात आला.