अक्षरसिंधु कलामंचचे बालनाट्य प्रथम
By admin | Published: January 14, 2015 10:17 PM2015-01-14T22:17:08+5:302015-01-14T23:20:57+5:30
राज्य बालनाट्य स्पर्धा : अंतिम फेरीत निवड
कणकवली : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बालनाट्य स्पर्धेत येथील अक्षरसिंधु साहित्य कलामंचच्या संघाने मुंबई विभागात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या संघाने धनंजय सरदेशपांडे लिखित ‘क्लोन’ हे बालनाट्य सादर केले होते. यामध्ये आयडियल इंग्लिश स्कूलच्या १८ बालकलाकार सहभागी झाले होते. या बालनाट्याला सांघिकसह विविध ५ पारितोषिके मिळाली आहेत.मुंबई विभागाअंतर्गत घेण्यात आलेल्या बालनाट्य स्पर्धेत ३८ संघांनी बालनाट्ये सादर केली. ही स्पर्धा मुंबई गिरगाव येथील मुंबई मराठी साहित्य संघ मंदिर येथे झाली. ‘क्लोन’ या बालनाट्याला सांघिक, दिग्दर्शन तसेच प्रकाश योजनेसाठी प्रथम, तर वेशभूषेसाठी द्वितीय व नेपथ्यासाठी विशेष पारितोषिक मिळाले आहे. या बालनाट्यातील बालकलाकार रिद्धी मोर्वेकर हिला उत्कृष्ट अभिनयाबद्दल विशेष गुणवत्ता पारितोषिकाने गौरविण्यात आले आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक सुहास वरूणकर यांनी हे बालनाट्य दिग्दर्शित केले होते, तर संजय राणे, अमोल मोर्वेकर यांनी नेपथ्य, प्रकाश योजना ऋषिकेश कोरडे, वेशभूषा वैष्णवी मोर्वेकर, नृत्य दिग्दर्शन शेखर गवस यांनी केले होते. अमर पवार, सुप्रिया प्रभूमिराशी, प्रभाकर जाधव यांचेही सहकार्य या बालनाट्यासाठी लाभले होते.
येथील कामगार कल्याण केंद्राच्या सभागृहात मंगळवारी बालनाट्य कलाकार तसेच या नाटकासाठी योगदान दिलेल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. विद्याधर तायशेटे, कामगार कल्याण केंद्राचे संचालक प्रभाकर जाधव, अक्षरसिंधु कलामंचचे संस्थापक अध्यक्ष विजय चव्हाण, अध्यक्ष प्राध्यापक हरिभाऊ भिसे, ऋषिकेश कोरडे, महानंद चव्हाण, शेखर गवस, संजय मालंडकर, अमोल मोर्वेकर, वैष्णवी मोर्वेकर यांच्यासह आयडियल इंग्लिश स्कूलचे शिक्षकवर्ग तसेच पालक उपस्थित होते.
शिक्षणमंत्र्यांकडून अभिनंदन
मुंबई विभागात प्रथम क्रमांक मिळविलेल्या ‘क्लोन’ या बालनाट्याची महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या बालनाट्य राज्यस्तरीय स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या संघाचे अभिनंदन केले असल्याची माहिती प्रा. हरिभाऊ भिसे यांनी दिली.