वेंगुर्ले नगरपरिषदेत सर्वच उमेदवारांचे अर्ज वैध
By admin | Published: November 2, 2016 11:30 PM2016-11-02T23:30:09+5:302016-11-02T23:30:09+5:30
वायंगणकर-रेपेंच्या वादाने वातावरण तापले : ७५ नगरसेवकपदांसाठी तर ११ नगराध्यक्षांसाठी अर्ज
वेंगुर्ले : वेंगुर्ले नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या बुधवारी छाननीच्या दिवशी हरकती नामंजूर करुन सर्वच उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र स्वीकृत करण्यात आले. नगराध्यक्षपदाचे शिवसेनेचे उमेदवार रमण वायंगणकर व भाजपचे राजन गिरप यांनी परस्पर हरकती घेतल्या. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दोन तास नगरपरिषदा अधिनियम १९६५ च्या तरतुदीनुसार कायद्यानुरूप दोन्ही उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र स्वीकृतीचे आदेश पारित करण्यात आले.
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात झालेल्या छाननीत नगरसेवकपदाचे सर्व ७५ नामनिर्देशन पत्र वैध ठरले. तर नगराध्यक्षपदाकरिता ११ नामनिर्देशन पत्रे होती. यामध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष उमेदवार रमण वायंगणकर यांनी भाजपचे नगराध्यक्ष उमेदवार राजन गिरप यांच्यावर गिरप नगरपरिषदेचे ठेकेदार असून, नगरपरिषद हद्दीतील आनंदवाडी येथील समाजमंदिराचे पडदे व क्रीडा साहित्य पुरविण्याचा ठेका घेतला होता. त्यामुळे ते पालिकेचे ठेकेदार असल्याने ते निवडणूक लढविण्यास पात्र नाही, अशी हरकत घेतली. याचवेळी गिरप यांनी शिवसेनेचे रमण वायंगणकर यांच्यावर माजी नगरसेवक अभिषेक वेंगुर्लेकर यांनी अनाहर (अपात्र) करणेबाबत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकरण दाखल असल्याची हरकत दुपारी १.२७ वाजता घेतली.
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दीपा भोसले यांनी या हरकती प्रकरणी नगर परिषदेकडील दप्तरी कागदपत्रांची तपासणी केली. यामध्ये ठेकेदार यांनी आनंदवाडी येथील कामाची पूर्तता केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायती व औद्योगिकनगरी अधिनियम १९६५ नुसार १६ (१) (ख) नुसार निविदा काम पूर्ण केल्याने संबधित व्यक्ती निवडणूक लढविण्यास पात्र ठरते, तर दुसऱ्या हरकतीतील रमण वायंगणकर यांचे अनाहर प्रकरण जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रलंबित आहे. जिल्हाधिकारी निर्णय देईपर्यंत ती व्यक्ती निवडणूक लढवू शकते, असा १९६५ मधील ४४ (३) नुसार या दोन्ही हरकती निवडणूक अधिकारी डॉ. दीपा भोसले यांनी हरकती नामंजूर करत अध्यक्षपदाची नामनिर्देशन पत्रे स्वीकृतीचे आदेश पारित केले. यावेळी निवडणूक निरीक्षक तथा उपजिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, तहसीलदार अमोल पवार, सहाय्यक निवडणूक अधिकारी रामदास कोकरे उपस्थित होते.
यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल, भाजपा वेंगुर्ले शहरप्रमुख सुषमा प्रभुखानोलकर, तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई, साईप्रसाद नाईक, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश नाईक, शहराध्यक्ष विवेकानंद आरोलकर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष दत्तप्रसाद आजगावकर, महिला शहर अध्यक्षा गौरी मराठे, समीर कुडाळकर, मारुती दौडशानट्टी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
हरकतींसाठी आक्रमक, निर्णयासाठी सामंजस्य
नगराध्यक्षपदाच्या गिरप आणि वायंगणकर या दोन्ही हरकती घेतलेल्या उमेदवारांमध्ये सुरूवातीपासून आक्रमकता दिसून येत होती. त्यामुळे इतर उमेदवारांना त्यांच्या निर्णयाबाबत उत्सुकता लागून राहिली होती. पण निर्णयावेळी दीपा भोसले यांनी दाखविलेल्या समयसुचकतेने दोघांच्यात सामंजस्याचे वातावरण निर्माण झाले होते.
भावी नगराध्यक्षपदासाठी पक्षांची डोकेदुखी
माजी नगराध्यक्ष संदेश निकम, सुनिल डुबळे व माजी नगरसेवक आत्माराम सोकटे या अपक्षांसह काँग्रेस, शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांतून अधिकृत उमेदवारांसह बंडखोरांनीही नगराध्यक्षपदसाठी दावेदारी दाखविली आहे. त्यामुळे भावी नगराध्यक्षांसाठी सर्वच पक्षांची डोकेदुखी वाढली आहे.
अपक्ष वीस तर मनसे निरंक
वेंगुर्ले निवडणुकीसाठी सर्वच प्रभागातील अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये काँग्रेस, शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसह वीस अपक्षांचाही समावेश आहे. मनसेतून मात्र एकही उमेदवार अर्ज भरू शकला नाही. दरम्यान, वेंगुर्ले नगरपालिकेसाठी एकूण ८६ अर्ज सध्या तरी रिंंगणात आहेत. ११ तारखेला माघारीनंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होईल.