सर्व मागण्या पूर्णत्वासाठी संघटनेत एकजूट आवश्यक
By admin | Published: April 10, 2015 09:39 PM2015-04-10T21:39:03+5:302015-04-10T23:51:32+5:30
भिकाजीराव पाटील : कणकवलीत पोलीसपाटलांचा मेळावा; नीतिमत्तापूर्ण वर्तन हवे
कणकवली : पोलीसपाटलांनी समाजात उजळ माथ्याने फिरण्यासाठी नीतिमत्तापूर्ण वर्तन ठेवावे. संघटनेत एकजूट ठेवल्यास सर्व न्याय्य मागण्या मान्य होतील, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य गाव कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष भिकाजीराव पाटील यांनी जिल्हा मेळाव्यात केले. किमानवेतन कायद्याप्रमाणे पोलीसपाटलांचे मानधन ८ हजार रूपये होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलीस पाटलांचा जिल्हामेळावा शुक्रवारी येथील शिवशक्ती मंगल कार्यालयात झाला. यावेळी राज्य सचिव कमलाकर मांगले, राज्य संघटना सल्लागार अशोक जाधव, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रदीप सावंत, कणकवली तालुकाध्यक्ष अनंत राणे, उपाध्यक्ष उदय सावंत, कुडाळ तालुकाध्यक्ष देऊ सावंत, वैभववाडी तालुकाध्यक्ष मनोहर राणे, कर्जत तालुकाध्यक्ष श्रीराम निवणे, सचिव पंकज धरत, रायगड उपाध्यक्ष रमेश पाटील, खजिनदार भिकू भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब शिंदे म्हणाले की, पोलीस पाटलांच्या हिताचे अनेक शासन निर्णय झाले असले तरी त्यांची अंमलबजावणी होत नाही. त्यासाठी एकजूट दाखवली पाहिजे. कणकवली तालुक्यात पोलीस पाटलाशी उद्धट वर्तन करणाऱ्या उपनिरीक्षकाची गचांडी धरण्याची ताकत पोलीस पाटलात आहे. पुणे येथे पोलीस पाटलाचा अवमान करणाऱ्या निरीक्षकाची १२ तासांत बदली झाली. त्यांना कारवाईचा अधिकार मिळाल्यास गावात सुधारणा होईल. राज्य सचिव कमलाकर मांगले म्हणाले की, पोलीसपाटील पदाच्या नूतनीकरणासाठी चौकशीची अट नको. पाच-दहा वर्षांच्या कार्यकालात तक्रार नसेल तर पदाची मुदत कोणत्याही चौकशी, मेडिकलविना वाढवून मिळावी. राज्यकर्ते अगदी ८५ वर्षानंतरही काम करतात. तर पोलीसपाटलांनाही वयाची अट नको. सक्षम असू तर ६५ वर्षानंतरही नूतनीकरणाची मुदत वाढवून मिळावी. पोलीसपाटलांना ग्रामपंचायत कार्यालयात स्वतंत्र कक्ष असावा असा शासन निर्णय २०११ साली निघूनही अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याची खंत मांगले यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
गावात पोलिसांच्या आशीर्वादाने दारूधंदे सुरू असतात. परंतु पोलीसपाटील बदनाम होतो. पोलिसांच्या हाताखाली काम करत असल्याने त्याकडे डोळेझाक करावी लागते. अधीक्षकांनी आमची तपासणी स्थानिक निरीक्षकांच्या अनुपस्थितीत करावी.