आपत्ती व्यवस्थापनात सर्व विभागानी समन्वयाने काम करावे : उदय चौधरी
By admin | Published: May 22, 2017 04:53 PM2017-05-22T16:53:55+5:302017-05-22T16:53:55+5:30
सिंधुदुर्गनगरीत आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात आढावा बैठक
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी दि. २२ : आपत्ती व्यवस्थापन केवळ एका विभागापुरती मर्यादित नसते. महसूल, विद्युत वितरण, कृषी, पाटबंधारे, ग्राम विकास, पोलीस, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांचा यामध्ये समावेश होतो. आपत्ती काळात सर्व विभागानी समन्वयाने काम करावे असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी येथे केले.
यंदाच्या पावसाळ्यासाठी आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात आढावा बैठक येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हा पोलीस अधिक्षक दिक्षीतकुमार गेडाम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी तसेच विविध शासकीय विभागाचे खातेप्रमुख सर्व तहसिलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
यंदाच्या पावसाळ्यात महसूल, पाटबंधारे, वन, सार्वजनिक बांधकाम, राज्य विद्यूत वितरण, बी. एस. एन. एल, उप प्रादेशिक परिवहन, पशुसंवर्धन मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, आरोग्य यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषद, नगरपालिका व ग्रामपंचायत आदी विभागानी समन्वय राखून तसेच प्राधान्याने कोणत्या बाबींवर लक्ष द्यावे याबाबत जिल्हाधिकारी चौधरी यांनी सविस्तर आढावा घेतला तसेच विविध सूचना या बैठकीत केल्या.
संभाव्य पूर परिस्थिती निर्माण होणा-या गावांची पाहणी तहसिलदार यांनी करावी, जोखिमग्रस्त गावांना भेटी देऊन विस्थापितांची निवा-याची सुविधा तयार ठेवावी, तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष सुरु करावा, पावसाळा कालावधीत गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, कृषी सहाय्यक यांनी मुख्यालय सोडू नये, बचाव व शोध पथके स्थापन करुन त्यांची माहिती अद्यावत करावी, नगरपालिका हद्दीतील गटारांची स्वच्छता, अनावश्यक झाडे किंवा झाडांची छाटणी करावी, बी.एस. एन. एल. केबल टाकण्याची कामे ज्या ठिकाणी सुरु आहेत सदर खोदाई केलेले रस्त्यांची दुरुस्ती ५ जूनपूर्वी पूर्ण करुन रस्ते सुव्यवस्थित ठेवावित, धोकादायक साकव असतील त्या ठिकाणी फलक लावावेत, राज्य व जिल्हा मार्गावर आप्त्कालीन परिस्थितीत कोणाशी संपर्क साधावा याची माहिती देणारे फलक ठिक-ठिकाणी उभारावेत, तालुकास्तरावर तसेच ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या साधन- सामुग्री आवश्यक त्या ठिकाणी पोहचवावी, आरोग्य विभागाने आरोग्य सेवेसाठी पथक तयार ठेवावीत, पशुसंवर्धन विभागाने पावसाळ्यापूर्वी पशुधनाचे लसीकरण पूर्ण करावे. आदी सूचना या बैठकीत जिल्हाधिकारी चौधरी यांनी दिल्या.
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी पॉवर पॉईंट प्रेन्झेटेशनच्या माध्यमातून जिल्ह्याचा आप्त्कालीन आराखडा विशद केला. कक्षप्रमुख राजश्री सामंत यांनी आभार मानले.