जिल्हा नियोजनची सर्व रक्कम खर्च करणार
By admin | Published: March 22, 2016 12:03 AM2016-03-22T00:03:17+5:302016-03-22T00:03:17+5:30
१२६ कोटी प्राप्त : जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची माहिती
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा विकासासाठी जिल्हा नियोजनअंतर्गत एप्रिल २०१५ मध्ये १२६ कोटी ५० लाख रुपये मिळाले असून, ही सर्व रक्कम खर्च होईल, असा विश्वास जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी चालू सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी शासनाने जिल्हा नियोजन विकासअंतर्गत १२५ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला होता. मात्र, शासनाने प्रत्यक्ष दीड कोटी रुपये वाढवून एप्रिल २०१५ मध्येच १२६ कोटी ५० लाख रुपये एवढी रक्कम सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केली असून, ही सर्व रक्कम प्राप्त झाली आहे. ही सर्व रक्कम मार्चअखेरपर्यंत १०० टक्के खर्च होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)
यूपीएससी, एमपीएससीचे क्लास सुरू करणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांची बुद्धिमत्तेची पातळी खूप आहे. याठिकाणी गुणवत्ताही मोठ्या प्रमाणात आहे. इयत्ता दहावी व बारावी या परीक्षांचे निकाल राज्यात सर्वांत जास्त प्रमाणात लागत असतात. मात्र, एवढी बुद्धिमत्ता असतानाही येथील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये टिकत नाहीत. एमपीएससी, यूपीएससी अशा परीक्षांमध्येही येथील युवकांचा टिकाव लागत नाही. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्यातील युवकांना या परीक्षांचे मार्गदर्शन व्हावे, यासाठी यूपीएससी आणि एमपीएससी या परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये क्लास सुरू करण्याचे निश्चित केले आहे. यासाठी सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर सावंतवाडी येथे यावर्षी क्लास सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये हे क्लासेस सुरू करण्यात येणार असून, यासाठी जिल्हा नियोजनमधून निधीची व्यवस्था करण्यात येणार आहे.
\
ग्रंथालयांना पुस्तकांसाठी दहा लाख
तालुकास्तरावरील प्रत्येकी एका शासनमान्य ग्रंथालयास एमपीएससी व यूपीएससीची पुस्तके पुरविणार आहेत. असा प्रस्ताव जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीया गोखले यांनी तयार केला असून, यासाठी दहा लाखांच्या निधीची तरतूद केल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात यांनी दिली.