शासनाच्या सर्व योजना आधारकार्डशी जोडणार
By admin | Published: February 20, 2015 10:21 PM2015-02-20T22:21:28+5:302015-02-20T23:13:16+5:30
ज्ञानेश्वर खुटवड : आधारकार्ड नोंदणी, दुरुस्तीसाठी विशेष मोहीम
सिंधुदुर्गनगरी : शासनाच्या सर्व योजना आता आधारकार्डशी संलग्न करण्यात आल्या असल्याने आधारकार्ड नोंदणी व दुरुस्तीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधारकार्ड नोंदणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून अद्याप आधारकार्डची नोंदणी करू न शकलेल्या नागरिकांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांमध्ये व महा ई-सेवा केंद्रावर आधारकार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती दिली.सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ३६ शाखांमध्ये व १६ महा ई-सेवा केंद्रांवर युनिट उपलब्ध करून देण्यात येणार असून कोणत्याही शुल्काशिवाय नागरिक येथे नोंदणी करू शकतात. तसेच नवीन नोंदणीशिवाय नाव, पत्ता यातील दुरुस्तीदेखील येथे केली जात आहे. शासनाच्या सर्व योजना आता आधारकार्डशी संलग्न करण्यात आल्या असल्याने योजनांच्या अविरत लाभ घेण्यासाठी व या योजनांपासून कोणताही नागरिक वंचित राहू नये यासाठी आधारकार्ड अत्यंत महत्वाचे आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या सोयीसाठी शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्येदेखील आधारकार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा व आधारकार्ड नोंदणीचे काम पूर्ण होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही खुटवड यांनी केले.कायमस्वरूपी आधारकार्ड सेंटरचे नाव व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेची नावे पुढीलप्रमाणे आहेत. देवगड तालुका - देवगड, शिरगांव, पडेल, मुणगे, फणसगाव, कुणकेश्वर, दहिबाव व मिठबांव, वैभववाडी तालुका - तिरवडे, भुईबावडा व वैभववाडी, कणकवली तालुका - कणकवली, खारेपाटण, फोंडाघाट व नाटळ. मालवण तालुका - मालवण, आचरा, तारकर्ली, चौके, सुकळवाड व असरोंडी, कुडाळ तालुका - कुडाळ, ओरोस, घोटगे, कामळेवीर, कसाल व कडावल, वेंगुर्ला तालुका - वेंगुर्ला व शिरोडा, सावंतवाडी तालुका - सावंतवाडी, बांदा, आंबोली, चौकुळ व मडुरा, दोडामार्ग तालुका - दोडामार्ग, साटेली-भेडशी याठिकाणी कायमस्वरुपी आधारकार्ड सेंटर सुरु करण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)