मतदारांना धमकी देणाऱ्या नितेश राणेंविरोधात सर्वपक्षीयांनी एकत्र यावे!, मनसे नेत्याने केले आवाहन
By सुधीर राणे | Published: December 13, 2022 04:01 PM2022-12-13T16:01:20+5:302022-12-13T16:02:27+5:30
भाजपचा केवळ कागदावरच विकास
कणकवली: भाजपचे काही नेते मतदारांवर दबाव आणणारी वक्तव्ये करीत आहेत. आमदार नितेश राणे हे तर मतदारांना थेट धमकी देत आहेत. या विरोधात सर्वपक्षीयांनी एकत्र येणे आवश्यक आहे. तसेच या निवडणुकीनंतर भाजप अर्थात राणे भाजप विरोधात सर्वांनी संघर्षासाठी उभे राहण्याची गरज आहे असे प्रतिपादन मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आज, मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उपरकर म्हणाले, जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुका या लोकशाही पद्धतीने न होता तिथे दबावाचे राजकारण केले जात आहे. नांदगाव येथील प्रचार सभेत आमदार नितेश राणे यांनी आपल्या विचाराचा सरपंच न दिल्यास निधी मिळणार नाही अशी थेट धमकीच दिली आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तसे राजकारण करण्याचे ठरवले आहे काय ? जिल्हातील भाजप वगळून इतर ग्रामपंचायतींना निधी देणार नाहीत का? तसेच जिल्ह्यातील भाजपच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये आतापर्यंत त्यांनी किती निधी दिला ? हे प्रथम जाहीर करावे.
भाजपचा केवळ कागदावरच विकास
मुळात नितेश राणे यांना माहीतच नाही की, केंद्र आणि राज्य शासनाचा निधी हा थेट ग्रामपंचायतीला मिळतो. भाजपच्या ताब्यातील ग्रामपंचायतींचा आतापर्यंत किती विकास झाला ? हे पाहिले तर त्या गावांमध्ये साधा रस्ता नाही, वीज नाही अशी परिस्थिती आहे. भाजपचा केवळ कागदावरच विकास झालेला आहे. ज्या गावात भाजपची सत्ता आहे. त्या गावातील दवाखान्यात डॉक्टर नाहीत, रेशनवर धान्य नाही, याकडे दुर्लक्ष करून नितेश राणे थेट निवडणुकीत जनतेला धमकी देत फिरत आहेत हे योग्य नाही.
केसरकर मंत्री झाल्यापासून दहशतवाद संपला का?
शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे यापूर्वी सिंधुदुर्गातील राणेंच्या दहशतवादावरच राजकारण करून सगळ्या निवडणुका जिंकून आले आहेत. आता केसरकर हे शिंदे गटात गेल्यानंतर त्यांना जिल्ह्यातला हा दहशतवाद संपल्याचा साक्षात्कार झाला आहे. त्यामुळे त्यांनी नितेश राणेंच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. केसरकर मंत्री झाल्यापासून जिल्ह्यातला दहशतवाद संपला का ? ते त्यांनी एकदा जाहीर करावे.
दहशतवादाच्या नावावर आपली संपूर्ण राजकीय कारकीर्द त्यांनी घालवली. विकास मात्र झाला नाही. ते शिक्षणमंत्री झाल्या पासून शाळा इमारतीच्या दुरूस्तीसाठी किती निधी मिळाला? किंवा त्यांनी केलेले जिल्हातील एक तरी काम जनतेला सांगावे असे आव्हानही उपरकर यांनी दिले.