सर्वच जागी शिवसेना रिंगणात
By admin | Published: April 8, 2015 09:52 PM2015-04-08T21:52:55+5:302015-04-08T23:53:48+5:30
जिल्हा बँक निवडणूक : २१ जागांसाठी ६५ उमेदवारांचे ८0 अर्ज
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निवडणूकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी शिवसेनाप्रणीत शिवसंकल्प पॅनेलच्या आणखी १३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे या निवडणूकीत सर्व २१ जागांवर शिवसेना आखाड्यात उतरली आहे. गेल्या १५ वर्षांपासून या बॅँकेवर असलेल्या सहकार पॅनेलच्या वर्चस्वालाच शिवसेनेने आव्हान दिले आहे. आज निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ८० अर्ज दाखल झाले. अर्जांची छाननी उद्या (९ एप्रिल) होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २७ एप्रिलपर्यंत आहे.
गेली आठ वर्षे जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत सहकार पॅनेलची सत्ता असून चेअरमनपदी डॉ. तानाजी चोरगे हे आहेत. यावेळीही सहकार पॅनेलने जुन्या १७ संचालकांसह ४ नवीन चेहऱ्यांना संधी देत ६ एप्रिलला २१ जणांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले. त्यामध्ये विकास सोसायटी मतदार संघ -मंडणगड - रमेश राजाराम दळवी, शेती संस्था मतदार संघात अनुक्रमे दापोली - वसंत शिंदे, खेड - बाबाजीराव जाधव, गुहागर - भालचंद्र बिर्जे.
चिपळूण - डॉ. तानाजी चोरगे, संगमेश्वर - राजेंद्र सुर्वे, रत्नागिरी - दिलीप तथा नाना मयेकर, लांजा - सुरेश साळुंखे, राजापूर - मनोहर सप्रे यांचा समावेश आहे. तर दुग्ध, पशू पैदास, वराह पालन संस्था मतदार संघातून सुरेश सखाराम पोवार, कक्कुट व शेळी पालन संस्थेमधून उदय रामचंद्र बेलोसे, कृ षी पणन शेती माल प्रक्रिया मतदार संघ - शेखर गोविंद निकम. नागरी संस्था - संजय रेडीज, गृहनिर्माण गृहप्रकल्प पगारदार संस्था मतदार संघ - अॅड. दीपक पटवर्धन. सहकारी संस्था मतदार संघ - दिनकर मोहिते, औद्योगिक संस्था मतदार संघ - मधूकर टिळेकर, मागासवर्गीय संस्था मतदार संघ - जयवंत जालगावकर, इतर मागासवर्ग मतदारसंघ - अमजद बोरकर, भटक्या विमुक्त विशेष मागास जाती मतदारसंघ - चंद्रकांत बाईत, महिला मतदार संघ - माधुरी गोखले आणि नेहा माने यांचा समावेश आहे.
शिवसंकल्प या सेनेच्या पॅनेलतर्फे जिल्हा बॅँक निवडणूकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या २१ उमेदवारांमध्ये विकास सोसायटी मतदारसंघातून अनुक्रमे किरण सामंत (रत्नागिरी), विलास चाळके (संगमेश्वर), सुधीर कालेकर (दापोली), दिवाकर मयेकर (राजापूर) यांचा तसेच दुर्वास वणकर (औद्योगिक), सत्यवान शिंदे (पणन), गणेश लाखण (दुग्ध), गीतांजली सावंत (महिला मतदारसंघ), गजानन पाटील (इतर मागासवर्ग), रचना महाडिक (महिला), नेत्रांजली आखाडे (एन.टी. ), विलास किंजळे (शेळी,मेंढी पालन), राजेश खेडेकर (गृहनिर्माण), विजय इंदुलकर (नागरी पतसंस्था), अनंत तेटांबे (चिपळुण), वनिता डिंगणकर (गुहागर), सुरज डांगे ( मजूर), सिध्दार्थ देवधेकर (मागासवर्गीय), आदेश आंबोळकर (लांजा), शशिकांत चव्हाण (खेड), दिनकर कदम (मंडणगड), हेमंत साळवी (राजापूर) यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
उमेदवार मिळविताना सेनानेत्यांची दमछाक
मंगळवारी शिवसेनाप्रणीत पॅनेलने ८ उमेदवारांचे अर्ज दाखल केले होते. मात्र उर्वरित अर्ज आज दाखल होणार असे सांगण्यात आले होते. हे अर्ज दाखल होणार की नाही याबाबत काहीशी साशंकता होती. मात्र आज उर्वरित १३ मतदारसंघांसाठी शिवसेनेच्या पॅनेलतर्फे अर्ज दाखल करण्यात आले. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रापासून शिवसेना दूर असल्याने जिल्हा बॅँक निवडणूकीत उमेदवार मिळविताना नेत्यांची चांगलीच दमछाक झाली. मात्र तरीही हार न मानता सर्व २१ जागांवर सेनेने उमेदवार उभे केले असून शिवसेनेच्या पॅनेलचे ८ ते ९ संचालक निवडून येतील, असा नेत्यांचा दावा आहे.