पुढील चार दिवस सर्वच दुकाने बंद ठेवून शासनास सहकार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:33 PM2021-04-07T16:33:07+5:302021-04-07T16:38:54+5:30
CoronaVirus Kankavli Sindhudurg- शासनाने नव्याने जाहीर केलेल्या निर्बंधांबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. याबाबत आज आम्ही व्यापाऱ्यांनी पालकमंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याशी चर्चा केली. तसेच शनिवार व रविवार या दिवशी सर्वच बंद राहणार की जीवनावश्यक सेवा सुरू राहणार याबाबत खुलासा करण्याची मागणी केली. यावर ही नियमावली राज्यशासनाची असल्याने त्यावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पालकमंत्र्यांनी ४ दिवसांचा अवधी मागितला आहे.
ओरोस : शासनाने नव्याने जाहीर केलेल्या निर्बंधांबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. याबाबत आज आम्ही व्यापाऱ्यांनी पालकमंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याशी चर्चा केली. तसेच शनिवार व रविवार या दिवशी सर्वच बंद राहणार की जीवनावश्यक सेवा सुरू राहणार याबाबत खुलासा करण्याची मागणी केली. यावर ही नियमावली राज्यशासनाची असल्याने त्यावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पालकमंत्र्यांनी ४ दिवसांचा अवधी मागितला आहे.
त्यामुळे पुढील चार दिवस सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी घेत पुढील ४ दिवसांत सर्व दुकाने बंद ठेवून शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करतानाच शनिवार रविवार दुकानांसह सर्वच बंद ठेवावे अशी मागणी शासनाकडे केली असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या नवीन नियमावलीबाबत सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघटनेने पालकमंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेत चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, माजी अध्यक्ष नितीन वाळके, दीपक बेलवलकर, श्रीराम शिरसाट आदी उपस्थित होते.
यावेळी प्रसाद पारकर म्हणाले की, शासनाने कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता नवीन नियमावली जाहीर केली आहे. मात्र, यात अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे नमूद आहे. मात्र, अन्य कोणती दुकाने बंद राहणार का, की काही दिवस बंद राहणार तसेच शनिवार व रविवार या दिवशीही जीवनावश्यक सेवा सुरू राहणार की पूर्णतः बंद असणार याबाबत उल्लेख नाही. त्यामुळे व्यापारी वर्गात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी त्यांनी ही नियमावली राज्यशासन सचिव स्तरावर तयार केली आहे. त्यामुळे ती सर्वांसाठी लागू होते. तसेच यात काही त्रुटी आहेत त्याबाबत सचिवांशी चर्चा करण्यासाठी आपल्याला ४ दिवसांची मुदत द्यावी. त्या चार दिवसांत सचिवांशी बोलून नियमावलीमध्ये बदल करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून पुढील ४ दिवस सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हे चार दिवस आपली दुकाने बंद ठेवून शासनाला व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
ज्या व्यापाऱ्यांनी आपली आरटीपीसीआर तपासणी केली आहे आणि लस घेतली आहे अशा व्यापाऱ्यांना त्यांची दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. व्यापाऱ्यांना लसीकरण करण्यासाठी गाव पातळीवर आवश्यक ती यंत्रणा तयार करावी. त्याचबरोबर शनिवार, रविवार दुकांनासह सर्वच बंद ठेवावे अशी मागणी शासनाकडे केली आहे, असेही ते म्हणाले.
पहिल्यांदाच झाली अन्य संघटनांची पत्रकार परिषद
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षामध्ये पालकमंत्री, जिल्हाधिकारी व अन्य मंत्र्यांच्या पत्रकार परिषदा होत असतात. प्रोटोकॉलनुसार त्यांना त्या ठिकाणी पत्रकार परिषदा घेण्याचे अधिकार आहेत. मात्र, पहिल्यांदाच या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघटनेची पत्रकार परिषद झाली.