विमानतळाचे श्रेय लाटण्यासाठी पालकमंत्र्यांची धडपड-राजन तेली यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 05:46 PM2018-11-22T17:46:48+5:302018-11-22T17:47:53+5:30
पालकमंत्री दीपक केसरकर हे निव्वळ चिपी विमानतळाचे श्रेय लाटण्यासाठी धडपड करीत आहेत. असा आरोप करतानाच पालकमंत्र्यांना विमानतळ सुरू करण्याची एवढीच घाई होती तर त्यांनी विमानतळापर्यंत जाणारे रस्ते, वीज, पाणी या मुलभुत सुविधा
कणकवली - पालकमंत्री दीपक केसरकर हे निव्वळ चिपी विमानतळाचे श्रेय लाटण्यासाठी धडपड करीत आहेत. असा आरोप करतानाच पालकमंत्र्यांना विमानतळ सुरू करण्याची एवढीच घाई होती तर त्यांनी विमानतळापर्यंत जाणारे रस्ते, वीज, पाणी या मुलभुत सुविधा आता पर्यन्त का निर्माण केल्या नाहीत? असा प्रश्न भाजपचे प्रदेश चिटणीस माजी आमदार राजन तेली यांनी उपस्थित केला आहे.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, चिपी येथील विमानतळासाठी कुंभारमाठ ते चिपी पर्यंत भूमीगत वीज वाहिन्या टाकण्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे. मात्र पालकमंत्री अजूनही ओव्हरहेड वाहिन्यांसाठीच आग्रही भूमिका घेत आहेत. तसेच त्याबाबतची चुकीची माहिती मुख्यमंत्र्यांना देत आहेत.
चिपी विमानतळासाठी चिपी, परुळे या भागातील जमिनी नाममात्र दराने खरेदी करण्यात आल्या. आता ज्या काही जमिनी शिल्लक आहेत, तेथे स्थानिक भूमिपुत्रांना व्यवसाय करायचे आहेत. मात्र या जमिनीवरुन उच्चदाब क्षमतेच्या वीज वाहिन्या गेल्या तर व्यवसाय, उद्योगधंदे करता येणार नाहीत. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचा ओव्हरहेड वीज वाहिन्यांना विरोध आहे.
चिपी, परुळे भागातील भूमिपूत्रांची ही व्यथा उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निदर्शनास आम्ही आणून दिली. तसेच ओव्हरहेड वीज वाहिन्या विमानाच्या उड्डाणावेळी अडथळा ठरू शकतात. त्यामुळे विमानतळ प्राधिकरण, आयआरबी, महावितरण आदींच्या बैठकीत भूमीगत वीज वाहिन्या टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या काही दिवसांत या भूमिगत वीज वाहिन्यांचे काम देखील सुरू होईल; मात्र पालकमंत्री दीपक केसरकर अजूनही ओव्हरहेड वाहिन्यांसाठी आग्रही आहेत. त्यांची ही भूमिका अनाकलनीय आहे.
चिपी विमानतळापासून काही अंतरावर कर्ली नदीचे पात्र आहे. या नदीतून मुंबई येथे असलेल्या "कॅटरमॅन' बोट सेवेप्रमाणे सेवा सुरू व्हायला हवी. तसे झाल्यास चिपी विमानतळावर उतरणारे प्रवासी सिंधुदुर्ग किनारपट्टीसह गोव्यात जाऊ शकतात. यातून विमानतळाला देखील चालना मिळणार आहे. कर्ली नदीतून बोट वाहतूक सुरू होण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे तेली यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री नोकऱ्या देणार का ?
चिपी विमानतळाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यांसाठी पालकमंत्र्यांनी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागितले. तसे शेकडो अर्ज चिपी, परुळे आदी ग्रामपंचायतींमध्ये जमा झाले आहेत . हे सर्व अर्ज पालकमंत्र्यांनी विमानतळाची उभारणी करणाऱ्या आयआरबी कंपनीकडे दिले आहेत. आता हे अर्ज करणाऱ्यांना पालकमंत्री नोकऱ्या देणार का? असाही प्रश्न तेली यांनी उपस्थित केला. तसेच संबधित ग्रामपंचायतीचे सरपंच बेरोजगारांच्या प्रश्नामुळे कंटाळले आहेत. त्याना बेरोजगार आम्हाला नोकरी कधी मिळणार असे वारंवार विचारत आहेत. असे राजन तेली यानी यावेळी सांगितले .