Maharashtra Vidhan Sabha 2019 : युती तुटण्याची नांदी कणकवलीतून : प्रमोद जठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 05:09 PM2019-10-09T17:09:19+5:302019-10-09T17:11:06+5:30
२०२४ मधील शिवसेना-भाजप युती तुटणार असून त्याची नांदी कणकवलीतून झाली आहे. सिंधुदुर्गातील युती तोडण्याचे काम शिवसेनेने केले असून त्याचा शेवट भाजप करणार असल्याचे माजी आमदार तथा सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सांगितले. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
सावंतवाडी : २०२४ मधील शिवसेना-भाजप युती तुटणार असून त्याची नांदी कणकवलीतून झाली आहे. सिंधुदुर्गातील युती तोडण्याचे काम शिवसेनेने केले असून त्याचा शेवट भाजप करणार असल्याचे माजी आमदार तथा सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सांगितले. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी त्यांनी भाजप नेते संदेश पारकर व अतुल रावराणे यांनी पुढील दोन दिवसांत नीतेश राणे यांच्या प्रचारात सहभागी व्हावे किंवा पक्षाचा सरळ राजीनामा द्यावा. अन्यथा त्यांची नाईलाजाने हकालपट्टी करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी जठार म्हणाले, नाणार प्रकल्पाला भविष्यात राणे यांचा विरोध असणार नाही, याच अटीवर त्यांना पक्षात घेण्यासाठी मी हिरवा कंदील दिला. राणेंचा भाजप प्रवेश शिवसेनेमुळेच रखडला होता. आता ते रितसर भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे कोकणात भविष्यात भाजप हाच नंबर एकचा पक्ष असेल. कणकवलीत शिवसेनेने भाजपच्या अधिकृत उमेदवारासमोर उमेदवार रिंगणात उतरल्याने युती तुटली आहे. आता यापुढील निवडणुकीत कोकणात शिवसेनेशी युती होणार नाही, असेही जठार यांनी सांगितले.
भाजपाला हक्काचा आमदार हवा आहे
नारायण राणे हे लोखंड आहे. त्या लोखंडाला भाजपाचा परिस स्पर्श झाला असल्याने भाजपात त्यांचे सोने होईल. राणे यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना आश्वासित केले आहे. ते भाजपची ध्येय धोरणे, पक्षहित नक्कीच पाहतील, असा विश्वास राणे यांनी दिला आहे. राजन तेली भाजपचे पुरस्कृत उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. आता राणेंच्या स्वाभिमान पक्षानेदेखील प्रचार सुरु केला आहे. भाजपाला हक्काचा आमदार या मतदारसंघात हवा आहे, असेही जठार म्हणाले.