दोडामार्ग नगरपंचायतीत युती

By admin | Published: October 4, 2015 10:25 PM2015-10-04T22:25:34+5:302015-10-04T23:36:13+5:30

आरपीआयला बाहेरचा रस्ता :‘९-८चा फॉर्म्युला’ निश्चित

Alliance of Dodamarg Nagar Panchayat | दोडामार्ग नगरपंचायतीत युती

दोडामार्ग नगरपंचायतीत युती

Next

कसई दोडामार्ग : दोडामार्ग नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजप-सेना अशी युती झाली आहे. शेवटच्या क्षणाला आरपीआय पक्षाला बाहेरचा रस्ता दाखवत या निवडणुकीत भाजपला ९ जागा, तर शिवसेनेला ८ जागा असा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. युतीच्या सतराही जागा निवडून आणू असे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी जाहीर केले.दोडामार्ग नगरपंचायतीची निवडणूक भाजप-शिवसेना युती करणार हे निश्चित होते. मात्र, एका जागेवरून वाद सुरू होता. एक जागा आरपीआयला सोडली, तर भाजपला आठ जागांवर समाधान मानावे लागणार होते.
शेवटच्या टप्प्यात आरपीआयला युतीमधून बाहेर करत भाजप-शिवसेना अशी युती झाली. युतीची घोषणा रविवारी शिवसेनेच्या कार्यालयात एकत्र बैठकीत जाहीर करण्यात आली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, संपर्कप्रमुख प्रकाश रेडकर, गणेशप्रसाद गवस, चेतन चव्हाण, पांडुरंग नाईक, आनंद रेडकर, संजय गवस आदी उपस्थित होते.
यावेळी म्हापसेकर यांनी सांगितले की, नगरपंचायतीच्या निवडणुकीत युती व्हावी, अशी आमची इच्छा होती. पदाधिकाऱ्यांचीही तशी मागणी होती. त्यानुसार भाजप-शिवसेना अशी युती झाली आहे. नगरपंचायतीवर युतीचा झेंडा फडकवून पाच वर्षात दोडामार्ग शहराचा विकास करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
दोडामार्ग एस. टी. बसस्थानक, गटार, बायपास रस्ता, मच्छीमार्केट या प्रमुख समस्या सोडवल्या जातील. त्यामुळे मतदारांनी युतीच्या उमेदवाराला विजयी करावे. विरोधकांनी सत्ता असताना दोडामार्गचा विकास केला नाही त्यामुळे समस्या ‘जैसे थे’ आहेत. यासाठी सर्व मतदारांनी भाजप-सेना उमेदवारांना मतदान करावे. नगरपंचायत निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप शहराच्या विकासाला प्राधान्य देण्यात येईल. नागरिकांच्या हितालाच प्राधान्य देण्यात येईल, त्यामुळे या निवडणुकीत युतीलाच मतदान करावे, असे आवाहन राजेंद्र म्हापसेकर यांनी केले.
ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच भाजपत अलिकडेच आले. केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता नसल्याने निधी आणता आला नाही. मात्र, आता युतीचा झेंडा फडकवल्यास नगरपंचायतीच्या माध्यमातून दोडामार्ग शहराचा विकास करणार असल्याचे बाबुराव धुरी यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)


आरपीआय पक्षाला अखेरच्या क्षणी बाहेरचा रस्ता.
भाजपला नऊ जागा, शिवसेनेला ८ जागा.
युतीच्या सतराही जागा निवडून आणू : सेना, भाजपला विश्वास.
एका जागेवरील वादही संपुष्टात.

Web Title: Alliance of Dodamarg Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.