महायुतीमुळेच २५ वर्षानंतर गेळे गावाला सुवर्ण दिवस - पालकमंत्री रविंद्र चव्हाण
By अनंत खं.जाधव | Published: October 9, 2024 04:54 PM2024-10-09T16:54:09+5:302024-10-09T16:54:53+5:30
मंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत जमिनीचे वाटप
सावंतवाडी : वर्षानुवर्षे ज्या प्रश्नासंदर्भात आपण सर्वजण झटत होतो व संघर्ष करीत होतो तो गेळे येथील कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न खऱ्या अर्थाने सुटला आहे. २५ वर्षानंतर हा सुवर्ण दिवस महायुती सरकारमुळेच पाहात आहे. त्यामुळे आपले आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी ठेवा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले आहे.
गेळे कबुलायतदार महाराष्ट्र शासनाच्या जमिनीचे वाटप व पोटहिस्सा मोजणीच्या कागदपत्रांचे वाटप सावंतवाडीत पार पडले. मंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात ग्रामस्थांना पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, लखमराजे भोंसले, राजन तेली, संजू परब, प्रभाकर सावंत आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री चव्हाण म्हणाले, आंबोली, चौकुळ व गेळे या गावांमधील कबूलायतदार गावकर प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली. तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा विषय पुढे नेण्याचे काम केले. तर शिक्षण मंत्री दीपक केसरकर व मी सातत्याने या प्रश्नाच्या पाठीशी राहून हा प्रश्न सोडविला. महायुती सरकारच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळेच हा प्रश्न सुटू शकला असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मंत्री केसरकर यांनी, आंबोली चौकुळ गेळे ही तीन गावे पर्यटनाचा केंद्रबिंदू राहणार असून मला ही गावे नेहमीच जवळची वाटली आहेत. आज खऱ्या अर्थाने लोकांचे सरकार कसे असते हे बघितले. आता या तीन गावांमधील ३५ सेक्शनचा प्रश्न राहिला नसून हे सेक्शन हटविण्यात आले आहे. त्यामुळे आता पूर्ण जमिन वाटप होणार आहे असेही केसरकर म्हणाले. यावेळी गेळेच्या गावाच्या वतीने पालकमंत्र्यासह, शिक्षण मंत्री व लखम सावंत भोसले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.