ओखी वादळात सापडलेल्या नौकांवरील खलाशांना देवगडला जेएनपीटीकडून धान्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 06:13 PM2017-12-08T18:13:03+5:302017-12-08T18:21:47+5:30
ओखी वादळात सापडलेल्या नौकांवरील खलाशांना माजी आमदार प्रमोद जठार यांच्या पुढाकाराने जेएनपीटीकडून धान्य तसेच जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात आला. ओखी वादळामुळे गुजरात, केरळ, तामिळनाडू, गोवा या ठिकाणच्या शेकडो नौका देवगड बंदरात आश्रयासाठी आल्या होत्या.
देवगड : ओखी वादळात सापडलेल्या नौकांवरील खलाशांना माजी आमदार प्रमोद जठार यांच्या पुढाकाराने जेएनपीटीकडून धान्य तसेच जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात आला.
ओखी वादळामुळे गुजरात, केरळ, तामिळनाडू, गोवा या ठिकाणच्या शेकडो नौका देवगड बंदरात आश्रयासाठी आल्या होत्या. या नौकांवरील खलाशांना सर्वस्तरातून मदत करण्यात आली होती. मुंबई येथील जे.एन.पी.टी.तर्फेही या खलाशांना तांदुळ, गव्हाचा आटा, बिस्कीट यासारख्या आवश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.
यासाठी माजी आमदार प्रमोद जठार यांनी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. देवगड येथे आश्रयास आलेल्या मच्छीमारांबाबतची माहिती जठार यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी तसेच राज्यमंत्री पोनी राधाकृष्णन यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर गडकरी यांनी जे.एन.पी.टी.ला मदत करण्याबाबतचे निर्देश दिले.
मदत वाटप करताना देवगड तहसीलदार वनीता पाटील,देवगडचे माजी आमदार अॅड. अजित गोगटे, जिल्हयाचे भाजपाचे सरचिटणीस जयदेव कदम,भाजपा देवगड तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, सरचिटणीस रविंद्र तिर्लोटकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. अशा प्रकारे मदत मिळवून दिल्याबददल आपदग्रस्त मच्छीमारांनी जे.एन.पी.टी व माजी आमदार प्रमोद जठार यांचे आभार मानले.