कोकणची लोककला दशावतार सादर करण्याची परवानगी द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 01:06 PM2020-10-09T13:06:46+5:302020-10-09T13:11:08+5:30
corona virus, sindhudurg, Nitesh Rane, dashavatriartist कोकणची लोककला असलेले दशावतारी नाटक सादर करण्याची परवानगी शासनाकडून देण्यात यावी. अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.
कणकवली: कोकणची लोककला असलेले दशावतारी नाटक सादर करण्याची परवानगी शासनाकडून देण्यात यावी. अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, दशावतार कला हे येथील जनतेचे सांस्कृतिक अंग आहे.या दशावतार कलेवर उपजीविका असणारे अनेक कलाकार आणि त्यांची कुटुंबे आहेत. शेकडो दशावतार नाट्य मंडळे सिंधुदुर्ग जिल्हयात कार्यरत आहेत. त्यांना दशावतारी कला नाट्यरूपाने सादर करण्याची परवानगी द्यावी व कलाकारांवर कोरोना काळात आलेले आर्थिक संकट दूर करावे .
सध्या सुरु असलेल्या कोरोना संसर्गामुळे संपूर्ण जगात हाहाकार माजविला आहे.त्यामुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत.कला क्षेत्र ठप्प झालेले आहे .त्याची झळ कोकणची पारंपरिक कला असलेल्या दशावतार कलेला सुद्धा पोहचलेली आहे . मार्च २०२० पासून आज मितीपर्यंत हा व्यवसाय ( कला सादरीकरण ) पूर्णपणे बंद आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुमारे ९ ० ते १०० दशावतार नाट्यमंडळे आहेत .
एका मंडळात कमीत कमी २० कलाकारांचा समावेश असतो . या कलाकारांवर आता उपासमारीची वेळ आलेली आहे . ८० टक्के कलाकारांचे उपजीविकेचे साधन दशावतार कला हेच आहे . कोरोना लॉकडाऊन काळात मार्च ते मे हा ९० दिवसाच्या कालावधीत हा कला व्यवसाय पूर्णपणे बंद झाला होता. त्याची झळ सर्वच नाटक कंपन्या, मंडळाच्या मालकांना व कलाकारांना पोहचली आहे . त्यांना या कले व्यतिरिक्त दुसरा कोणताही उपजीविकेचा पर्याय नसल्याने त्यांच्यासह कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे .
आज बऱ्याच व्यवसायांना छोट्या - मोठ्या प्रमाणावर शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे . आता नवरात्रोत्सवापासून नाट्यकला सादरीकरणचा व्यवसाय सुरु होणार किंवा नाही याबाबत सर्व कंपनी मालक व कलाकार यांच्या मनात प्रश्नचिन्ह उभे झाले आहे . तसेच त्यांच्यामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे .
दशावतार नाट्यप्रयोग सादरीकरणाच्या वेळी कोविड १९ च्या प्रतिबंधासाठी खबरदारी घेण्यासाठी योग्य त्या नियम व अटी घालण्यात याव्यात . परंतु त्यांना परवानगी देऊन त्यांचे उपजीविकेचे साधन सुरु करावे . कोकणची लोककला असलेल्या दशावतार कलेचे नाट्यप्रयोग सुरु करणेबाबत संबंधितांना आपल्या स्तरावरून आदेश व्हावेत अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी या पत्रातून केली आहे.