अलोरे-शिरगाव पोलिसांची सतत होतेय परवड

By admin | Published: December 12, 2014 10:01 PM2014-12-12T22:01:14+5:302014-12-12T23:40:53+5:30

प्रचंड ओढाताण : ३१ गावांची कायदा सुव्यवस्था सांभाळताना जीव येतो मेटाकुटीस ...

Alor-Shirgaon police is constantly being run | अलोरे-शिरगाव पोलिसांची सतत होतेय परवड

अलोरे-शिरगाव पोलिसांची सतत होतेय परवड

Next

शिरगाव : पश्चिम घाटातून कोकणात प्रवेश करतानाच कर्तव्यावर हजर असलेल्या बारा किलोमीटर कुंभार्ली घाटाच्या पायथ्याशी असलेल्या जलविद्युत निर्मिती केंद्र परिसराकडे लक्ष ठेवून सतर्क असणाऱ्या अलोरे शिरगाव पोलीस ठाणे कर्मचाऱ्यांची कर्तव्य बजावताना प्रचंड ओढाताण होत आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ३१ गावांची कायदा सुव्यवस्था सांभाळताना त्यांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते.
इंग्रज राजवटीपासून शिरगावला पोलीस ठाणे होते, तथापि १९६५ सालापासून कोयना प्रकल्पामुळे कोळकेवाडीला महत्त्व आल्याने अलोरे येथे मुख्य ठाणे व पोफळीत विशेष सुरक्षा म्हणून ठाणे उभारण्यात आले. आजअखेर या ठाण्यात ३८ पुरुष-महिला कर्मचारी कार्यरत आहेत. प्रतिदिन पाच कर्मचाऱ्यांची साप्ताहिक सुटी, तीन पोफळी वीजगृह सुरक्षा, तीन कुंभार्ली घाट चेकनाका, २ डीवायएसपी कार्यालय, कोर्ट कामे, सहा महिला कर्मचारी, एक कर्मचारी रिफ्रेशर कोर्ससाठी गेल्यानंतर प्रत्यक्ष अपघात, चोरी, विशेष सुरक्षा या तातडीच्या कामांसाठी ३१ गावांसाठी केवळ १८ ते २० कर्मचारी कार्यरत असतात.
विशेष कामगिरीवगळता पुरुष कर्मचाऱ्यांसोबत महिला पोलीस असून, कार्यालयीन कामकाज व वायरलेस यासाठीच कर्तव्यावर नेमले जाते. अनेक ठिकाणी प्रत्यक्ष कोर्टाचे समन्स, तंटामुक्ती यासाठी कर्तव्यावर जाताना भ्रमणध्वनी यंत्रणाही कार्यान्वित नसते आणि दुर्गम भागात आपत्कालीन स्थितीत संपर्कही होत नाही, अशी स्थिती आहे.
५० वर्षे कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एकाच ठिकाणी निवासव्यवस्था असायला हवी, अशी मागणी १९८५ सालापासून करण्यात येत आहे. तत्कालीन पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या आदेशाने गृहमंत्रालयाकडे प्रस्ताव गेले. मात्र, आजअखेर शासन पोलिसांना निवासस्थाने बांधून देऊ शकले नाही. तथापि कोयना प्रकल्पाने आपल्या वसाहतीतही त्यांना सरकारी भाड्याने निवासस्थाने दिली होती. शिरगावात पोलीस ठाणे गेल्यानंतर मोडकळीस आलेली पोलीस वसाहत बांधण्याऐवजी तोडण्यात आली. चार निवासस्थाने पोलिसांनी वापरात ठेवली. मात्र, ७ मे २०१४ रोजी त्या इमारतीवर जांभळाचे झाड पडले आणि तेथे असणारे कर्मचारी उरला संसार घेऊन निघून गेले.
कोयना प्रकल्पाकडे बँका, पतपेढ्या, पोस्ट खात्याला अत्यावश्यक सेवा म्हणून देण्यास जागा व निधी आहे. मात्र, महत्त्वाची सुरक्षा सांभाळणाऱ्या पोलिसांसाठी मात्र काहीच उपाययोजना का नाही ? असा पाठपुरावा करण्यातही पोलीस यंत्रणा उदासीन दिसत आहे. एकूणच मोठ्या क्षेत्राची सुरक्षा ठेवणारे पोलीस त्रासदायक स्थितीत कार्यरत आहेत. (वार्ताहर)

तत्कालिन पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या आदेशाने घरांसाठीचे प्रस्ताव गृहमंत्रालयाकडे गेले. मात्र, आजअखेर कोणतेही शासन पोलिसांना घरे बांधून देऊ शकले नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.

भौगोलिक प्रतिकूलता ठरणार महत्त्वाची.
विद्युत प्रकल्पाची सुरक्षा सर्वांत महत्त्वाची.
३१ दुर्गम भागातील गावे कार्यक्षेत्रात.
३० वर्षांपासून निवासस्थानांची केवळ चर्चा.
अलोरे पोलीस वसाहत वास्तव्याविना.

Web Title: Alor-Shirgaon police is constantly being run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.