‘ओंकार’च्या संचालकांनाही अटक करा
By admin | Published: March 16, 2017 11:23 PM2017-03-16T23:23:41+5:302017-03-16T23:23:41+5:30
अडीच कोटींचा घोटाळा : न्यायालयाचे देवरुख पोलिसांना आदेश
देवरुख : शहरातील ओंकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील २ कोटी ५० लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी या पतसंस्थेच्या संचालकांना अटक करण्याचे आदेश देवरुखचे प्रथमवर्ग न्यायाधीश एस. एन. सरडे यांनी गुरुवारी पोलिसांना दिले.
शहरातील प्रथितयश व सातत्याने आॅडिट ‘अ’मध्ये असणाऱ्या ओंकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत सुमारे दोन वर्षांपूर्वी २ कोटी ५० लाख रुपयांचा अपहार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. संचालक मंडळाने पत्रकार
परिषद घेऊन घोटाळा झाल्याची माहितीदेखील दिली होती. याचदरम्यान घोटाळ्याची नेमकी खोली स्पष्ट होण्याकरिता
शासकीय लेखापरीक्षणाची मागणीदेखील जिल्हा
निबंधकांकडे करण्यात आली
होती. लेखापरीक्षण पूर्ण
होताच संचालक मंडळाने या अपहारप्रकरणी पोलिसांकडे धाव घेतली होती.
संचालक मंडळाने आपले म्हणणे देवरुख न्यायालयासमोर सादर करून तत्कालीन व्यवस्थापिका वासंती निकम हिच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी केली होती. या मागणीप्रमाणे देवरुख न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
न्यायालयाचा आदेश मिळताच देवरुख पोलिस ठाण्यात निकम हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अधिक तपास करून काही कालावधीनंतर निकमला अटक केली होती. निकम हिची उलटतपासणी व जाबजबाब तसेच महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केल्यानंतर तपासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली.
हा अपहार कसा झाला, अपहारामध्ये क ोण कोण सामील होते? याची देखील माहिती निकम हिने पोलिसांना दिल्याची माहिती तपासात पुढे येत आहे. त्यामुळे काही संचालकांचा अपहाराला छुपा पाठिंबा असल्याचा संशय आहे. त्यामुळे देवरुख पोलिसांनी संचालकांना अटक करण्याची परवानगी देवरुख न्यायालयाकडे मागितली होती.
देवरुखचे प्रथमवर्ग न्यायाधीश एस. एन. सरडे यांनी गुरुवारी ती मान्य करून संचालकांना अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे आता संचालकांना कोणत्याही क्षणी अटक करण्याची स्थिती निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)