आंबोलीतील जवान शहीद

By admin | Published: May 23, 2016 12:42 AM2016-05-23T00:42:51+5:302016-05-23T00:55:26+5:30

कुपवाडा येथे चकमक : पाच अतिरेक्यांना घातले कंठस्नान; सिंधुदुर्ग जिल्ह्यावर शोककळा

Ambalali jawan martyr | आंबोलीतील जवान शहीद

आंबोलीतील जवान शहीद

Next

महादेव भिसे-- आंबोली ==कुपवाडा जिल्ह्यातील चक ड्रगमुल्ला येथे अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत गंभीर जखमी झालेले पांडुरंग महादेव गावडे (वय ३२, आंबोली-मुळवंदवाडी, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग) हे जवान शहीद झाले. शनिवारी दुपारी झालेल्या या चकमकीत पांडुरंग यांच्या डोक्याला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. मात्र, उपचार सुरू असताना रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबतची माहिती रविवारी सकाळी गावडे यांच्या कुटुंबाला कळविण्यात आली आहे. शहीद गावडे यांचे पार्थिव आज सोमवारी आंबोलीत आणण्यात येणार असून त्यानंतर अंत्यस्कार करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सतीश कदम यांनी दिली.
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे कार्यरत असलेले पांडुरंग गावडे याचा समावेश असलेली लष्कराची तुकडी चक ड्रगमुल्ला परिसरात कोम्बिंग आॅपरेशन करत होती. याच गावातील एका घरात पाच अतिरेकी लपून बसले असल्याची माहिती लष्कराला मिळाली. शनिवारी सकाळी पांडुरंग गावडे यांचा समावेश असलेल्या तुकडीने या घरात झडतीसत्र सुरू केले. यावेळी घरात लपलेल्या अतिरेक्यांनी या तुकडीवर गोळीबार केला.सर्वात पुढे असलेल्या पांडुरंग यांच्या डोक्याला गोळी लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ श्रीनगर येथील सैन्यदलाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राणज्योत मालवली. रविवारी सकाळी संरक्षण विभागाच्यावतीने एक प्रसिध्दपत्रक जारी करण्यात आले. त्यात जवान पांडुरंग गावडे हे शहीद झाल्याचे जाहीर करण्यात आले. याबाबतची माहिती महाराष्ट्र शासन तसेच जिल्हा प्रशासन यांनाही देण्यात आली. जिल्हा प्रशासनाने सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पांडुरंग गावडे यांच्या कुटुंबियांना ही माहिती दिली . पांडूरंग शहीद झाल्याचे समजताच गावात एकच सन्नाटा पसरला. पांडुरंग दीड वर्षापासून मराठा लाईट इन्फ्रट्रीमार्फत कुपवाडा येथे कार्यरत होते. त्यांच्या पश्चात वडील, आई, दोन भाऊ, पत्नी प्रांजल, दोन मुले प्रज्वल (वय ५) व वेदांत (वय ४ महिने) असा परिवार आहे.
सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकरांकडून कुटुंबाचे सांत्वन
पांडुरंग गावडे हे शहीद झाल्याचे प्रशासनाकडून समजताच पालकमंत्री दीपक केसरकर यांनी थेट आंबोली येथे दाखल होत गावडे कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी पांडुरंग यांचे वडील महादेव गावडे यांना दु:ख अनावर झाले होते. तहसीलदार सतीश कदम, सावतंवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर उपस्थित होते.
पत्नीचा आक्रोश
हृदय पिळवटून टाकणारा
पांडुरंग गावडे यांच्या लग्नाला जेमतेम सहा वर्षे झाली असून, त्यांच्या पत्नीचे माहेर सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथे आहे. रविवारी सकाळी पांडुरंग यांच्या निधनाची बातमी गावडे कुटुंबाला समजताच पत्नीचा आक्रोश बघून अनेकांचे मन हेलावून जात होते. एक महिन्यापूर्वी पांडुरंग हे घरी आले होते. तेव्हाच्या आठवणी हुंदक्यातून दाटून येत होत्या. आई तसेच वडील यांना मुलाच्या निधनाचे वृत्त ऐकून सुरूवातीला धक्काच बसला होता.
आंबोलीच्या स्मशानशेडबाबत सैनिकांकडून नाराजी
आंबोलीतील स्मशानशेड नादुरूस्तीबाबत माजी सैनिकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच ही बाब पालकमंत्री केसरकर यांंच्या कानावर घातली. आंबोलीसारख्या ठिकाणी आम्ही नादुरूस्त स्मशानभूमीत किती निवेदने द्यायची, असा सवाल केला. याची दखल घेत पालकमंत्री केसरकर यांनी बांधकाम अधिकाऱ्यांना तातडीने स्मशानशेड दुरूस्त करण्याची सूचना दिली. तसेचही स्मशान शेड उद्यापर्यंत कार्यरत व्हावी, असे आदेश दिले.
आंबोली सैनिकी परंपरा असलेले गाव
आंबोलीत मोठ्या प्रमाणात सैनिक देशसेवेसाठी असून, साधारणत: सध्या ४०० सैनिक कार्यरत आहेत. तर ५०० च्या आसपास सैनिक निवृत्त झाल्याचे आंबोलीतून स्पष्ट करण्यात आले. मात्र याबाबतचा आकडा सोमवारी समजेल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)

पांडुरंग गावडे २००१ मध्ये
सैन्यात भरती
पांडुरंग हे २००१ मध्ये बेळगाव येथे मराठा लाईफ इन्फन्ट्रीमधून भारतीय सैन्यात भरती झाले होते. देशभर सेवा बजावत असताना त्यांनी आपली चमक विविध क्षेत्रात सोडली होती. ते चांगले फुटबॉल, हॉकी व बास्केटबॉलपटू होते. तसेच त्यांना रेडिओ आॅपरेटर युनिटचे पारितोषिकही मिळाले होते. गेली दोन वर्षे ते ४१ राष्ट्रीय रायफलमध्ये कार्यरत होते.


गावडे कुटुंबाला
सैनिकी परंपरा
गावडे कुटुंबाला सैनिकी परंपरा आहे. पांडुरंग यांचे दोन्ही मोठे भाऊही सैन्यातच सेवा बजावत आले आहेत. त्यापैकी गणपत गावडे हे पांडुरंगचे मोठे भाऊ निवृत्त सैनिक असून, मधला भाऊ अशोक महादेव गावडे हे सध्या धुळे येथे एनसीसीमधून सैन्यात कार्यरत आहेत. त्यामुळे गावडे कुटुंबाकडे अभिमानाने बघितले जाते.


पार्थिव आज आंबोलीत
शहीद पांडुरंग गावडे यांचे पार्थिव रविवारी उशिरा श्रीनगर येथून निघणार आहे. ते आज सोमवारी सकाळी गोवा येथे येईल. त्यानंतर दुपारच्या सुमारास आंबोलीत दाखल होईल, अशी माहिती तहसीलदार सतीश कदम यांनी दिली. तर कुटुंबानेही पार्थिव केव्हा येणार त्यानंतरच अंत्यसंस्कार उद्या करायचे क ी उद्या, मंगळवारी करायचे, याचा निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. अंत्यसंस्कार आंबोली येथेच होणार असल्याचेही गावडे कु टुंबाने स्पष्ट केले.

नऊ तास तुंबळ धुमश्चक्री
सुमारे नऊ तास चाललेल्या या चकमकीत लष्कराच्या जवानांनी घरात लपलेल्या पाचही अतिरेक्यांचा खातमा केला. मात्र अतिरेक्यांच्या गोळीबारात पांडुरंग गावडे शहीद झाले तर अन्य दोन जवान जखमी झाले.

देशसेवा करताना शहीद
झाल्याचा अभिमान
पांडुरंग गावडे यांना लहानपणापासूनच देशसेवेची आवड होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे आंबोलीतच झाले असून, त्यानंतर बेळगाव येथे मराठा लाईफ इन्फन्ट्रीमधून भारतीय सैन्यात भरती झाले होते. त्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांनी देशसेवा बजावली. मात्र, शनिवारी कुपवाडा येथे अतिरेक्यांशी लढताना ते शहीद झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त गावडे कुटुंबीयांना समजताच एकीकडे दु:खाचा डोंगर; मात्र दुसरीकडे पांडुरंग यांचे वडील महादेव गावडे यांनी आपला मुलगा देशाची सेवा बजावताना शहीद झाला, याचा आपल्याला अभिमान असल्याचे ते प्रत्येकाला सांगत होते.


वेदांतचा नामकरण सोहळा ठरला शेवटचा क्षण
पांडुरंग यांचा प्रांजल यांच्याबरोबर २०१० मध्ये विवाह झाला होता. पांडुरंग यांना प्रज्वल (वय ५) व चार महिन्यांचा वेदांत अशी दोन मुले आहेत. फेबु्रवारी महिन्यात पांडुरंग हे एका महिन्याच्या रजेवर आले होते. यावेळी त्यांनी आपल्या मोठ्या मुलाचा वाढदिवस, तर धाकट्या मुलाचा नामकरण सोहळा साजरा केला होता. वेदांतचा नामकरण सोहळा आणि प्रज्वलचा वाढदिवस हा त्यांच्या कुटुंबासाठी अखेरचा क्षण ठरला .

जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील चकड्रगमुल्ला येथील याच घरात अतिरेकी लपून बसले होते.

Web Title: Ambalali jawan martyr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.