आंबोली पर्यटकांनी चिंब, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वाहतूक कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 12:17 AM2018-07-09T00:17:56+5:302018-07-09T00:18:26+5:30
जून महिन्यात तुरळक पावसाच्या सरींमुळे आंबोलीतील धबधबे प्रवाहहीन झाल्यामुळे पर्यटकांची निराशा झाली होती. मात्र जून महिना संपताच जुलैच्या पहिल्याच रविवारी आंबोलीत पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती.
सावंतवाडी - जून महिन्यात तुरळक पावसाच्या सरींमुळे आंबोलीतील धबधबे प्रवाहहीन झाल्यामुळे पर्यटकांची निराशा झाली होती. मात्र जून महिना संपताच जुलैच्या पहिल्याच रविवारी आंबोलीत पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. त्यामुळे सकाळपासूनच आंबोलीत वाहतूक कोंडीला समोरे जावे लागत होते. आंबोलीत सर्वच धबधब्यांवर मोठी गर्दी होती.
आंबोलीत जुलैमधील पहिला रविवार चांगलाच हाऊसफुल्ल होता. सकाळपासूनच कोल्हापूर तसेच कर्नाटकमधील पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यामुळे चांगलीच वाहतूक कोंडी झाली होती. आंबोलीतील सर्वच धबधब्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी दिसत होती.
आंबोलीत गर्दी होणार म्हणून पोलिसांनीही मोठ्या प्रमाणात खबरदारीचा उपाय म्हणून कडक बंदोबस्त ठेवला होता. पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंबोली पर्यटकांना वाहतुकीचा अडथळा होऊ नये, यासाठी सुसज्ज पार्किंगची सोयही करण्यात आली आहे. पण आंबोलीत पर्यटकांची संख्याही वाढतच चालली आहे. त्यामुळे आज हजारो पर्यटकांनी वर्षा पर्यटनाचा आनंद लुटला. अनेकांना सेल्फीचा मोह आवरला नाही. मात्र पोलिसांनी संरक्षक कठड्याच्या बाजूला जाण्यास पर्यटकांना मज्जाव केल्याचे दिसत होते.