सिंधुदुर्ग : डंपर चोरी करताना तिघांना पकडले, एक साताऱ्याचा, दोघे कोल्हापूरचे- दाणोली येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 10:27 AM2018-10-01T10:27:01+5:302018-10-01T10:54:52+5:30
सोमवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास दाणोली येथे तिघा संशयितांना डंपर चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना आंबोली व दाणोली ग्रामस्थांना करवी पकडण्यात आले
आंबोली (सिंधुदुर्ग) : सोमवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास दाणोली येथे तिघा संशयितांना डंपर चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना आंबोली व दाणोली ग्रामस्थांना करवी पकडण्यात आले. ज्या तिघांना पकडण्यात आले त्यांना आंबोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे .
आंबोली येथील नंदकुमार नार्वेकर यांच्या मालकीचा डंपर क्रमांक जीए 0७ टी ५१४७ दाणोली येथील या डंपरवरील चालक जॉन्सन मार्सेलिन लॉडरीक यांच्या घरी दाणोली येथे उभा होता. सोमवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास कुणीतरी डंपर चालू करून चोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे जॉन्सन यांच्या लक्षात आले.
जॉन्सन घराच्या बाहेर लगेच आला. त्यावेळी डंपर चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेली व्यक्ती डावा बाजूचा दरवाजा उघडून पळून गेली .जॉन्सन याने न घाबरता त्या व्यक्तीचा म्हणजे सुभाष गंगाराम सावंत ४८ यांचा पाठलाग केला. परंतु तो सापडू शकला नाही. तसंच पुढे आल्यानंतर जॉन्सन याला बावळाट तिठा येथे एक संशयित अल्टो कार क्रमांक एम.एच ११ बी.व्ही ९१६३ हे उभी असल्याचे दिसले. त्यांने लगेच त्या कारजवळ जाऊन कारमधील दोघा संशयित व्यक्तींची विचारना केली. त्यावेळी त्या दोघा व्यक्तींना नीट उत्तर देता आली नाही.
त्यामुळे जॉन्सन यांचा संशय बळावला व त्याने लगेच कारची चावी काढून घेतली . त्यांना कारमध्येच बसून राहण्यास सांगितले. लगेचच जॉन्सन याने आंबोली पोलिसांना व डंपर मालकांला बोलावून घेतले. साडेपाच वाजताच्या सुमारास त्या दोघा व्यक्तींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. ते आंबोलीच्या दिशेने येऊ लागले. तेवढ्यात दाणोली पासून दोनशे मीटर आंबोलीच्या दिशेने एक व्यक्ती चालत जाताना दिसली.
त्या व्यक्तीला कॉन्स्टेबल गजानन देसाई यांनी गाडीतच बसून आंबोलीला कसे जायचे असे त्याला विचारले. त्या व्यक्तीला गाडी त्याच्या साथीदाराची असल्याचे लक्षात आल्यावर तो पळून जाण्याच्या तयारीत होता. जवळपास शंभर फूट अंतर पळाल्यावर गजानन देसाई व डंपर मालक सुनील नार्वेकर यांनी पाठलाग करत त्या व्यक्तीला म्हणजे सुभाष सावंत याला पकडून त्याच्या दोन साथीदारांसोबत त्यांच्याच अल्टो कारमध्ये बसून आंबोली पोलीस स्थानकात घेऊन आले. सुरुवातीला हे तिघेही एकमेकांना ओळखत नसल्याचे सांगत होते. परंतु पोलिसी हिसका दाखवल्यानंतर तिघांनीही आपापली खरी ओळख सांगितली व उद्देशही सांगितले .
हे तिघेही सराईत गुन्हेगार दिसत असून यातील सुभाष गंगाराम सावंत (राहणार ४८ दिवडि . ता माण. सातारा), अन्वर दाऊद दोसानि (६२), आसिफ रफीक पठाण (वय ३० दोघेही राहणार संभाजीनगर कोल्हापूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील डंपर चोरीप्रकरणी यांचा काही हात आहे का याचीही चौकशी होणार आहे .
डंपर चोरी टोळीचा पर्दाफाश
गेल्या वर्षभरात जिल्ह्यामध्ये डंपर चोरीप्रकरण मोठ्या प्रमाणावर वाढली होती. ज्यामुळे डंपर चालक मालक हैराण झाले होते. पोलिसांनाही त्यांना पकडण्यात अपयश येत असताना जॉन्सन याने दाखवलेल्या धाडसामुळे या डंपर चोरांना पकडण्यात यश आले. यावेळी त्यांना आंबोलीतील पोलीस कॉन्स्टेबल गजानन देसाई, मायकल डिसोझा, सुनील नार्वेकर, उत्तम नार्वेकर, राजू राऊळ यांनीही मदत केली या सर्वांचे परिसरातून कौतुक होत अाहे.