अमित ठाकरे कोकण दौऱ्यावर, रोजगाराबाबत युवक युवतींनी मांडल्या व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 08:34 PM2022-07-05T20:34:12+5:302022-07-05T21:52:53+5:30
मनविसेत नव्याने सक्रिय होऊ इच्छिणाऱ्या तरुणांशी संवाद साधला.
सावंतवाडी : चांगलं शिक्षण घेऊनही सिंधुदुर्ग जिल्ह्यात तरुण तरुणींना गोव्यात नोकरीसाठी जावं लागतं, सिंधुदुर्गात पुरेशा रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत त्या सुविधा सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरूणांनी आपली कैफियत मनसेचे विद्यार्थी सेना प्रमुख अमित ठाकरे यांच्याकडे मांडली.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियान राबवत असून ते कोकण दौऱ्यावर आहेत. आज, त्यांनी सावंतवाडी येथील मँगो हॉटेल सभागृहात मनविसेत नव्याने सक्रिय होऊ इच्छिणाऱ्या तरुणांशी संवाद साधला. तसेच जिल्ह्यात मनविसे भक्कम कशी करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी पक्षाचे सरचिटणीस परशुराम उपरकर, जिल्हाध्यक्ष धीरज परब, शहराध्यक्ष आशिष सुभेदार, तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांच्यासह मनसे तसेच मनविसेचे अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर तिथेच त्यांनी सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला येथील विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, मनसेचे पदाधिकारी यांच्याशी प्रत्येक तालुक्याबाबत चर्चा केली आणि लवकरच संघटनात्मक पुनर्बांधणी करून जुन्या व नवीन पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन नवीन रचना करण्यात येईल असे स्पष्ट संकेत दिले. ठाकरे यांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी तिन्ही तालुक्यांतील शेकडो मनसे पदाधिकारी तसंच महाराष्ट्र सैनिक यांनी गर्दी केली होती. चांगलं शिक्षण घेऊनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण तरुणींना गोव्यात नोकरीसाठी जावं लागतं, सिंधुदुर्गात पुरेशा रोजगार संधी उपलब्ध नाहीत असा मुद्दा काही तरुणांनी ठाकरे यांच्याशी चर्चा करताना मांडला.
सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आमच्या संपर्कात नाहीत, त्यामुळे आम्हाला मार्गदर्शन मिळत नाही. राजसाहेब ठाकरे यांच्या कानावर जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सांगता येत नाही अशी तक्रार खंत ठाकरे यांच्यापुढे व्यक्त केली.