५0 लाखांच्या रकमेचा तिढा सुटला
By admin | Published: October 9, 2016 11:33 PM2016-10-09T23:33:17+5:302016-10-09T23:33:17+5:30
रकमेबाबत संशय नसल्याचे आयकरचे पत्र : न्यायालयाच्या परवानगीनंतर पोलिस पैसे देणार
सावंतवाडी : आरोंदा दूरक्षेत्रावर सापडलेल्या ५० लाखांच्या रोकड प्रकरणाचा तपास आयकर विभागाने पूर्ण केला असून, या पैशामागे कोणताही संशय नसल्याचे त्यांनी पोलिसांना कळविले आहे. तसेच पुढील निर्णय आपल्या स्तरावर घ्या, असेही आयकर विभागाने पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. हे पत्र चार दिवसांपूर्वी सावंतवाडी पोलिसांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता ५० लाखांच्या रकमेचा गुंता सुटला असून, संबंधितांना हे पैसे न्यायालयीन प्रकियेतून घ्यावे लागणार आहेत.
७ जुलैला रात्रीच्या सुमारास आरोंदा दूरक्षेत्रावर वाहनांची तपासणी करीत असताना पोलिसांना गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका कारमध्ये ५० लाखांची रोकड सापडली होती. या रकमेसोबत दोघे युवक होते. त्यांनी हे पैसे व्यवसायातील असल्याचे पोलिसांना सांगितले होते. तरीही पोलिसांनी सखोल चौकशी करण्यासाठी युवकांसह पैसे ताब्यात घेतले होते. या रकमेबाबत तत्कालीन पोलिस उपअधीक्षक प्रविण चिंचाळकर व पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी चौकशी केली. मात्र, त्या दोन युवकांच्या उत्तरामध्ये त्यांना संशय आला. तसेच पैशांसोबत रितसर कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी रक्कम सील केली होती. मात्र त्या युवकांना सोडून दिले होते.
त्यानंतर हा तपास कोल्हापूर व पुणे येथील आयकर विभागाकडे देण्यात आला. त्यांनी चार ते पाच वेळा या युवकांची चौकशी केली. तसेच त्यांना रितसर कागदपत्रे हजर करण्याचे आदेशही देण्यात आले होते. ही चौकशी पुणे येथील कार्यालयात करण्यात आली होती. सतत चार महिने आयकर विभागाने या रकमेबाबत चौकशी केल्यानंतर अखेर चार दिवसांपूर्वी सावंतवाडी पोलिसांना रितसर पत्र पाठवून या पैशांमागे कोणताही संशय नसल्याचे स्पष्ट केले आहे.
तसेच आपल्या पोलिस ठाण्याच्या स्तरावर कोणती कारवाई करायची असेल तर करू शकता, असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता पोलिसांनी पैसे सील केल्याने हे पैसे न्यायालयील मार्गानेच संबधितांना घ्यावे लागणार आहेत. त्यासाठी सावंतवाडी न्यायालयाला रितसर बॉण्ड द्यावा लागणार आहे. त्यानंतर पोलिस हे पैसे त्या युवकांच्या ताब्यात देणार आहेत. (प्रतिनिधी)
पाटील : न्यायालयीन प्रक्रियेतूनच रक्कम घ्यावी लागेल
४आयकर विभागाने पैशांमागे कोणताही संशय नसल्याचे पत्र पोलिस ठाण्याला पाठविले आहे. मात्र, ही रक्कम सील करण्यात आल्याने न्यायालयीन मार्गानेच हे पैसे घ्यावे लागतील, असे पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी सांगितले.