गुड न्यूज: तिलारीत ७० हेक्टरमध्ये साकारणार ॲम्युजमेंट पार्क, पर्यटन विकासाच्या आशा पल्लवित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 12:36 IST2025-01-01T12:36:21+5:302025-01-01T12:36:40+5:30
वैभव साळकर दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग ) : तिलारी खोऱ्यात ७० हेक्टरमध्ये उभारण्यात येणाऱ्या बहुचर्चित ॲम्युजमेंट पार्कच्या उभारणीच्या हालचाली पाटबंधारे ...

गुड न्यूज: तिलारीत ७० हेक्टरमध्ये साकारणार ॲम्युजमेंट पार्क, पर्यटन विकासाच्या आशा पल्लवित
वैभव साळकर
दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) : तिलारी खोऱ्यात ७० हेक्टरमध्ये उभारण्यात येणाऱ्या बहुचर्चित ॲम्युजमेंट पार्कच्या उभारणीच्या हालचाली पाटबंधारे खात्याने सुरू केल्या असून, या पार्क उभारणीच्या अनुषंगाने इच्छुकांनी अर्ज सादर करण्याबाबतची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे दोडामार्ग तालुक्याच्या पर्यटन विकासाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या तिलारी धरण परिसराचा पर्यटन विकास व्हावा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी तिलारी विकास पर्यटन मंच आणि राजकीय नेते प्रयत्न करत होते. त्यातच आमदार दीपक केसरकर यांनी पर्यटन तज्ज्ञांना आणून तिलारी धरण परिसराची काही महिन्यांपूर्वी पाहणी केली होती व त्याच वेळी तिलारी खोऱ्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲम्युजमेंट पार्क उभारून पाचशे जणांना रोजगार देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे या प्रकल्पाची प्रतीक्षा सर्वांनाच होती. अखेर याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पाटबंधारे खात्याने त्याबाबत एक निविदाच प्रसिद्ध केली आहे. परिणामी, तिलारीच्या पर्यटन विकासाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
प्रकल्पाच्या कार्यवाहीला सुरुवात
तिलारी मुख्य धरणाच्या खालच्या बाजूस हा ॲम्युजमेंट पार्क उभारण्याचा शासनाचा विचार असून, पूर्वीच्या या ठिकाणी असलेल्या आयनोडे गावच्या हद्दीत हा प्रकल्प उभा राहणार आहे. त्याकरिता पाटबंधारे खात्याच्या ताब्यात असलेल्या ७० हेक्टर जमिनीचा वापर केला जाणार आहे. सद्य:स्थितीत संकल्पना, बांधकाम नियोजन, देखभाल दुरुस्ती, संचलन करणे व हस्तांतरण करणे आदी प्राथमिक कामांच्या कार्यवाहीला सुरुवात झाली आहे.
पार्क उभारणीसाठीच्या इच्छुकांना १७ फेब्रुवारीची आहे मुदत
पार्क उभारणीच्या अनुषंगाने प्राथमिक कामे करण्याच्या पार्श्वभूमीवर इच्छुक असलेल्यांनी आपले अर्ज सादर करावेत, यासाठी निविदा जाहिरात प्रसिद्ध केली असून इच्छुकांना १७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदत देण्यात आली आहे.