रशियातील चिमुकल्याला लागला मराठीचा लळा!  सिंधुदुर्गातील आजगाव प्राथमिक शाळेत गिरवतोय धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 12:48 PM2023-01-27T12:48:32+5:302023-01-27T12:54:21+5:30

मिरॉनला ही शाळा प्रचंड आवडली. त्याने याच शाळेत शिकण्याचा आई-वडिलांकडे हट्ट धरला.

An eleven year old boy from Russia Miron Alegewij Lukeshivi is studying Marathi in a primary school in Ajgaon Sindhudurg district | रशियातील चिमुकल्याला लागला मराठीचा लळा!  सिंधुदुर्गातील आजगाव प्राथमिक शाळेत गिरवतोय धडे

रशियातील चिमुकल्याला लागला मराठीचा लळा!  सिंधुदुर्गातील आजगाव प्राथमिक शाळेत गिरवतोय धडे

googlenewsNext

सावळाराम भराडकर

वेंगुर्ला : संत ज्ञानेश्वरांनी ‘माझा मराठीचा बोलू कौतुके परि अमृतातेहि पैजासी जिंके’ अशा शब्दात मराठी भाषेबद्दल सार्थ अभिमान व्यक्त केला आहे. याच मराठी भाषेचा लळा आपल्या आई-वडिलांसमवेत पर्यटक म्हणून आलेल्या रशियातील चिमुरड्याला लागला आहे. मिरॉन ॲलेगेविज लुकेशिवी असे या अकरा वर्षांच्या मुलाचे नाव आहे. त्याने चक्क सिंधुदुर्ग जिल्हयातील आजगाव येथील प्राथमिक शाळेत मराठी भाषेचे धडे गिरविण्यास सुरुवात केली आहे.

रशिया व युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर लुकेशिवी कुटुंबीय भारतात आले आहे. त्यांनी काहीकाळ गोव्यात वास्तव्य केले. त्यानंतर ते सावंतवाडी-मळगाव येथे वास्तव्य करीत आहेत. येथे राहत असताना मिरॉनला येथील मराठी भाषेचा लळा लागला. अगदी थोड्या कालावधीत त्याची येथील मुलांसमवेत गट्टी जमली. त्याने आपल्या पालकांकडे आजगावच्या प्राथमिक शाळेत शिकण्याचा हट्ट धरला. या शाळेतील शिक्षकांनीदेखील याकामी त्यांना सहकार्य केले. गेल्या महिन्यापासून मिरॉन या शाळेत चाैथीच्या वर्गात मराठीतून शिक्षण घेत आहेे. अल्पावधीतच त्याने मराठीतील काही शब्द, गणिती अंक आत्मसात केले आहेत.

संधी मिळाल्यास पुन्हा येणार..

भारतातील संस्कृती, खाद्यपदार्थ याबद्दल त्याला आवड निर्माण झाली आहे. त्याला वडापाव, समोसा खूपच आवडतो. शाळेतील प्रार्थना त्याने तोंडपाठ केली असून, शाळेतील पोषण आहारही आवडीने खातो. मिरॉनचे रशियातील शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. तो एप्रिल २३ पर्यंत आजगाव येथील मराठी शाळेत शिकणार आहे. भविष्यात परत संधी मिळाल्यास परत नक्की या शाळेत येणार असल्याचे तो आवर्जून सांगतो.

शाळा आवडली म्हणून..

मिरॉनचे वडील ॲलेगेविज भारतातून ते वर्क फ्रॉम होम करीत आहेत. गोव्यातून कोकणात हे दाम्पत्य आले असता आजगावच्या प्राथमिक शाळेचा १५०वा महोत्सव सुरू होता. या कार्यक्रमावेळी मिरॉनला ही शाळा प्रचंड आवडली. त्याने याच शाळेत शिकण्याचा आई-वडिलांकडे हट्ट धरला. त्यामुळे लुकेशिवी दाम्पत्यांनी येथेच राहण्याचा निर्णय घेतला.

मिरॉनचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असूनही मराठी शाळेत शिकण्याचा निर्णय घेतला. २० दिवसांत मिरॉन मराठी भाषा बोलण्यास शिकला. तो वर्गमित्रांसोबत खेळतो आणि जेवण्याच्या पंगतीचा आनंदही घेतो. - ममता जाधव, मुख्याध्यापिका, जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा, आजगाव नं. १

Web Title: An eleven year old boy from Russia Miron Alegewij Lukeshivi is studying Marathi in a primary school in Ajgaon Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.